दादरा नगर-हवेलीतून शिवसेनेचं सीमोल्लंघन, आता अन्य राज्यातही निवडणूक लढवणार? आदित्य ठाकरेंना सांगितला प्लॅन
कलाबेन डेलकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 47 हजार 447 मतांनी पराभव केलाय. या विजयाच्या निमित्तानं शिवसेनेनं राज्याबाहेर पहिल्यांदाच निवडणूक जिंकली आहे. या विजयामुळे शिवसेनेचं मनोबल वाढलं आहे. अशावेळी आदित्य ठाकरे यांनी बाहेर राज्यात निवडणूक लढवण्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई : दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर यांनी दणदणीत विजय मिळवलाय. कलाबेन यांना एकूण 1 लाख 12 हजार 741 मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार महेश गावीत यांना 63 हजार 382 मते मिळाली. डेलकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 47 हजार 447 मतांनी पराभव केलाय. या विजयाच्या निमित्तानं शिवसेनेनं राज्याबाहेर पहिल्यांदाच निवडणूक जिंकली आहे. या विजयामुळे शिवसेनेचं मनोबल वाढलं आहे. अशावेळी आदित्य ठाकरे यांनी बाहेर राज्यात निवडणूक लढवण्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. (Will ShivSena contest elections in other states? Aditya Thackeray explained the role of Shivsena)
दादरा नगर-हवेलीत शिवसेनेचा मोठा विजय झालाय. पक्ष संघटना वाढीपेक्षा न्याय मिळवण्यासाठी हा विजय महत्वाचा होता. अन्याया विरोधातील हा लढा होता. आता शिवसेना इतर राज्यातही निवडणूक लढणार आहे. आम्हाला विजयाची अपेक्षा आहे, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडलीय. केंद्रीय नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं जात आहे, असं पत्रकारांनी विचारलं असता. मुख्यमंत्री वेगवेगळ्या सर्व्हेत टॉप फाईव्हमध्ये येत असतात. मुख्यमंत्री सर्व मित्र पक्ष आणि प्रशासनाला सोबत घेऊन काम करत आहेत, त्यामुळे याचं श्रेय सर्वांचं असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
कलाबेन डेलकरांना पहिल्या फेरीपासून आघाडी
कलाबेन यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. कलाबेन यांनी अगदी पहिल्या फेरीपासूनच 9 ते 12 हजार मतांची आघाडी कायम ठेवली होती. आज सकाळी साडे आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण 22 राऊंड पार पडले. यावेळी कलाबेन यांना एकूण 1,12,741 मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार महेश गावीत यांना 63 हजार 382 मते मिळाली.
मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर कलाबेन डेलकरांना तिकीट
कलाबेन यांचे पती मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. मुंबईतील सी ग्रीन हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, नंतर सुसाईड नोटमध्ये दादरा नगर हवेलीतील प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचं नाव आलं होतं. पटेल यांच्या दबावामुळेच आत्महत्या करत असल्याचं डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे कलाबेन डेलकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी मुलासह शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेने कलाबेन यांना पोटनिवडणुकीचं तिकीटही दिलं होतं.
सहानुभूती आणि आक्रोश
मोहन डेलकर हे सातव्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. ते लोकप्रिय खासदार होते. लोकांमध्ये मिसळणारे होते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमुळे येथील मतदारांमध्ये आक्रोश होता. कलाबेन यांना भाजपकडून न्याय न मिळाल्यानेही जनतेत चीड होती आणि कलाबेनबाबत सहानुभूती होती. या सहानुभूतीचाच फायदा कलाबेन यांना झाल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
इतर बातम्या :
अहमदनगरमध्ये तरुणाची आत्महत्या! मंत्री शंकरराव गडाखांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक
Will ShivSena contest elections in other states? Aditya Thackeray explained the role of Shivsena