Rahul Gandhi : मी खरं बोलतोय म्हणून तपास यंत्रणामागे लावल्या, देशात रोज लोकशाहीची हत्या; राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रत्येक माणूस या संस्थांमध्ये बसलेला आहे. देशातील या संवैधानिक संस्थांवर आरएसएसचा कब्जा आहे, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी नवी दिल्लीत कलम 144 लागू केलं आहे. तसेच काँग्रेसला दिल्लीत निदर्शने करण्यास मनाई करण्यात आली आहे.
नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर (central government) हल्ला चढवला आहे. देशात आज लोकशाही शिल्लक राहिलीच नाही. रोज लोकशाहीची हत्या होत आहे. सध्या महागाई आणि बेरोजगारीवर कोणीच बोलत नाही. बोलणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. मी खरं बोलतोय म्हणून आमच्या मागे तपास यंत्रणा लावल्या आहेत, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला. यावेळी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही (rss) टीका केली. काँग्रेसने महागाई, बेरोजगारी आणि वस्तुंवरील वाढवलेल्या जीएसटीच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू केली आहे. काँग्रेसकडून आज पंतप्रधानाच्या निवासालाही घेराव घातला जाणार आहे. तर महाराष्ट्रात काँग्रेसकडून राजभवनाला घेराव घातला जाणार आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्लाबोल केला आहे.
देशातील 70 वर्ष सुरू असलेली लोकशाही या सरकारने 8 वर्षात संपुष्टात आणली आहे. देशात सध्या चार लोकांची हुकूमशाही सुरू आहे. संसदेत आवश्यक मुद्द्यांवर चर्चा होत नाहीये. महागाई आणि बेरोजगारीवरही बोलू दिलं जात नाही. आपण काही संस्थांना स्वतंत्र ठेवत असतो. पण केंद्र सरकारच्या विरोधात काही बोललं तर सीबीआय आणि ईडी लावल्या जात आहेत, असं राहुल गांधी म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रत्येक माणूस या संस्थांमध्ये बसलेला आहे. देशातील या संवैधानिक संस्थांवर आरएसएसचा कब्जा आहे, असा दावाही त्यांनी केला.
केंद्र सरकार खोटारडं
सर्वाधिक बेरोजगारी भारतात आहे. भारतात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. मात्र या गोष्टी अर्थ मंत्र्यांना दिसत नाहीये. कोणत्याही गावात आणि शहरात जा. लोकच तुम्हाला महागाई वाढल्याचं सांगतील. पण सरकारला ही महागाई दिसत नाहीये. सरकार महागाई आणि बेरोजगारीला घाबरत आहे. हे लोक जनतेच्या शक्तीला घाबरत आहेत. कारण हे लोक खोटारडे आहेत. खोटे बोलत आहेत. देशात महागाई नाही, बेरोजगारी नाही, असं हे लोक खोटं सांगत आहेत. चीनने घुसखोरी केली नाही हे सुद्धा खोटं सांगितलं जात आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.
आंदोलनाला परवानगी नाकारली
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी नवी दिल्लीत कलम 144 लागू केलं आहे. तसेच काँग्रेसला दिल्लीत निदर्शने करण्यास मनाई करण्यात आली आहे. आम्ही काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपाल यांना पत्र लिहिलं आहे. त्यांना राज्यात कलम 144 लागू करण्यात आल्याने तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. तसेच तुम्हाला आंदोलन करण्याची परवानगी दिली जात नाहीये, असंही बजावल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.