Deepak Kesarkar : ताटामध्ये कोण थुंकला? तुमच्या ताटात काय जेवायला घातलं का?; दीपक केसरकरांचे आव्हाडांना प्रत्युत्तर
Deepak Kesarkar : आव्हाड वाईट शब्दात बोलले. सीट देऊन कोणी माझ्यावर उपकार केले नाही. तिथे दोन वेळा राष्ट्रवादीचा उमेदवार पडला होता. ती सीट मला दिली. मी 25 हजार मतांनी निवडून आलो होतो. ती सीट राष्ट्रवादीने दोनदा गमावल्यानंतर मला देण्यात आली होती.
मुंबई: अहो केसरकर किती बोलता पवार साहबांविरुद्ध. एकेकाळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात? 2014 ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन. जिथे आहात तिथे सुखी राहा. खाजवून खरूज काढू नका, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर (deepak kesarkar) यांच्यावर टीका केली होती. त्याला दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या वाडवडिलांनी दानधर्म केला म्हणून आम्ही निवडून येतो. आम्हीही राबराब राबतो. आमचंही मतदारसंघात गुडविल असतं. मला जी सीट तुम्ही दिली होती, त्या जागेवर राष्ट्रवादीचा (ncp) उमदेवार दोनदा पडला होता, असं सांगतानाच ताटामध्ये कोण थुंकला? तुमच्या ताटामध्ये काय जेवायला घातलं का मला?, असा सवाल दीपक केसरकर यांनी आव्हाड यांना केला आहे.
दीपक केसरकर हे टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. आव्हाड वाईट शब्दात बोलले. सीट देऊन कोणी माझ्यावर उपकार केले नाही. तिथे दोन वेळा राष्ट्रवादीचा उमेदवार पडला होता. ती सीट मला दिली. मी 25 हजार मतांनी निवडून आलो होतो. ती सीट राष्ट्रवादीने दोनदा गमावल्यानंतर मला देण्यात आली होती. मी शिवसेनेतून उभा राहिलो तेव्हा 45 हजार मतांनी विजयी झालो. लोकांमध्ये आमचं गुडविल असतं. आम्ही काही तरी काम करतो. आमच्या वाडवडिलांनी दानधर्म केलेला असतो. आम्ही एवढे राबराब राबतो आणि तुम्ही काहीही म्हणायचं? ताटामध्ये कोण थुंकला? तुमच्या ताटामध्ये काय जेवायला घातलं का मला?, असा संतप्त सवाल केसरकर यांनी केला आहे.
कुटुंबप्रमुख आमच्यासोबत असतील
नेत्यांनी भूतकाळात जगू नये. वर्तमानकाळात जगावं. भाजपमध्ये आमची ताकद मिळाली तर बाकी पक्ष टिकणार नाहीत. आमचे कुटुंब प्रमुख आमच्या सोबत असतील याची मला खात्री आहे. यापूर्वीच शरद पवारांनी सांगितले की, राणेंना सेनेतून बाहेर यायला मी मदत केली. शिवसेना फोडल्याचं पवारांनीच मान्य केलं आहे. मी नवीन काही सांगत नाही. बाळासाहेबांचे शिवसैनिक पवारांच्या पालखीचे भोई कधीच होणार नाहीत, असं ते म्हणाले.
तर दहावेळा बोलणार
निलेश राणे हे वारंवार उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. भाजपकडून ठाकरे घराण्यावर कोणीही टीका करणार नाही असं आमच ठरलं आहे. त्यांनी दहा वेळा टीका केली तर मी दहा वेळा बोलणार. माझ्या वयाच्या निम्म्या वयाची राणे यांची मुलं आहेत. म्हणून मी त्यांना लहान म्हटलं. मला तसं म्हणण्याचा अधिकार आहे. त्यांना कोकणी जनतेने त्यांची यापूर्वीच लायकी दाखवली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.