दहा दिवस ना मोबाईल, ना ई मेल, ना भेटीगाठी, अरविंद केजरीवालांचा नेमका प्लॅन काय?
Arvind Kejriwal vipassana : अरविंद केजरीवाल आणि आप हे लवकरच पुढील वर्षात होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकच्या तयारीला लागणार आहेत. मात्र त्या कार्यक्रमात व्यस्त होणापूर्वीच केजरीवाल यांनी विपश्यना करण्याचा निर्णय घेतला.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) पुढील दहा दिवस मोबाईल, ई मेल किंवा प्रत्यक्ष भेटीगाठींपासून लांब राहणार आहेत. केजरीवाल दहा दिवस कोणत्याही कार्यक्रमात दिसणार नाहीत. ते दहा दिवस एकांतवासात असतील. त्याचं कारण म्हणजे अरविंद केजरीवाल हे पुढील 10 दिवस विपश्यना (Vipassana) करणार आहेत. त्यासाठी केजरीवाल रविवारी जयपूरला रवाना झाले. जयपूरमधील दहा दिवसांच्या विपश्यना शिबिराला ते हजेरी लावणार आहेत. या शिबिरात ते फोन, ई मेल किंवा भेटीगाठींपासून दूर राहून, ध्यान करणार आहेत.
अरविंद केजरीवाल आणि आप हे लवकरच पुढील वर्षात होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकच्या तयारीला लागणार आहेत. मात्र त्या कार्यक्रमात व्यस्त होणापूर्वीच केजरीवाल यांनी विपश्यना करण्याचा निर्णय घेतला. पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि गोवा या महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका पुढील वर्षी अपेक्षित आहेत.
अरविंद केजरीवाल हे पक्ष विस्तारासाठी सातत्याने गोवा, गुजरात, उत्तराखंड आणि पंजाबचा दौरा करत आहेत. येत्या काळात त्यांचे प्रचार दौरे सुरु होतील.
दरम्यान, अरविंद केजरीवाल हे विपश्यनेसाठी नाशिकमधील इगतपुरी इथेही आले होते. 2017 मध्ये ते इगतपुरीतील विपश्यना केंद्रात होते.
विपश्यना म्हणजे नेमकं काय?
विपश्यना हा एक प्राचीन आणि अद्भुत असा ध्यान प्रयोग आहे. स्वत्व शोधणं, आत्मिक शांती आणि समाधानचा हा मार्ग आहे. आत्मशुद्धी आणि आत्मनिरीक्षणाची सर्वोत्तम ध्यान पद्धती आहे.
हजारो वर्षांपूर्वी भगवान बुद्ध यांनी विपश्यनेची निर्मिती केली. त्यांनी विपश्यना जनसामान्यांपर्यंत पोहोचवली. स्वत:ची नव्याने ओळख होण्यासाठी ध्यान-विपश्यना आवश्यक आहे. आजच्या जगात मेडिटेशनला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. मात्र हजारो वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी जगाला विपश्यनेची ओळख करुन दिली.
विपश्यनेचे पाच नियम
विपश्यना ध्यानाचे पाच सिद्धांत आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारे जीव-हिंसा न करणे, चोरी करु नये, ब्रह्मचर्याचं पालन करणे, अपशब्द टाळणे आणि नशा न करणे यांचा समावेश आहे. विपश्यना ध्यान सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळी करता येऊ शकतं. एक तास सकाळी आणि एक तास दुपारी ध्यान करणे अत्यंत लाभदायक असतं. झोपण्यापूर्वी पाच मिनिटे आणि उठल्यानंतर पाच मिनिटे जरी ध्यान केलं तरी फायद्याचं असल्याचं सांगितलं जातं.
संबंधित बातम्या
राणेंचं मनस्वास्थ बिघडलंय, त्यांनी विपश्यना करावी; संजय राऊतांचे हल्ले सुरूच