BJP LEADERS : राज्यातल्या भाजप नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या, राज्यात मोठे बदल होणार?
आधी चंद्रकांत पाटलांनी अमित शाह यांची भेट घेतली आणि आता फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा हा दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या दृष्टीनेही महत्वाचा असल्याचं बोललं जात आहे.
मुंबई : राज्यातल्या भाजप नेत्यांच्या सध्या दिल्ली वाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. आधी चंद्रकांत पाटील दिल्ली दरबारी जाऊन आल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्या राज्यातल्या राजकारण मोठ्या बदलांचे हे संकेत आहेत का? अशा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ्याच्या बैठकीसाठी हे दोन्ही नेते दिल्लीत गेले असल्याचंही बोललं जातंय.
तिकीट कापलेल्यांना पुन्हा मोठी संधी
राज्यात भाजपचं सरकार असताना जे नेते मंत्री होते त्यातल्या काही नेत्यांना पुढच्या निवडणुकीत संधी न देता त्यांची तिकीटं कापन्यात आली होती. त्यामध्ये माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, यांचा समावेश आहे. तिकीट कापलेल्यांमध्ये आता राष्ट्रवादीत असलेले आणि फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात काही काळ मंत्री असलेले एकनाथ खडसे यांचाही समावेश होता. खडसेंनी आपली खदखद वेळोवेळी बाहेर काढत अखेर भाजपला रामराम ठोकला. मात्रा बावनकुळे आणि तावडे यांना मोठी जबाबदारी देण्यात आलीय. बावनकुळेंना आता विधान परिषदेवर संधी देण्यात आलीय तर तावडे यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्त करण्यात आलं आहे.
फडणवीसांच्या भेटीत दडलंंय काय?
आधी चंद्रकांत पाटलांनी अमित शाह यांची भेट घेतली आणि फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा हा दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या दृष्टीनेही महत्वाचा असल्याचं बोललं जात आहे. त्या दृष्टीने राज्यात किती संघटनात्मक बदल होणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अमित शाह यांच्या भेटीत भाजपच्या राज्यातली कामकाजाबद्दल आणि सहकार क्षेत्राबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर आली. तसेच चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्रतील साखर उद्योगाबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याचंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे फडणवीसांच्या भेटीत काय दडलंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.