कांजूरमार्ग कारशेडप्रकरणी आदित्य ठाकरेंनी अभ्यास करावा; देवेंद्र फडणवीसांचा सल्ला
आदित्य ठाकरे यांनी तरी सौनिक समितीचा अहवाल वाचावा. कांजूरमार्ग कारशेडबाबत या समितीने काय म्हटलं याचा अभ्यास करावा, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना दिला. (devendra fadnavis reaction on Metro car shed project at Mumbai’s Kanjur Marg)
मुंबई: आदित्य ठाकरे हे तरुण आहेत. नवीन मंत्री आहेत. त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत, असं सांगतानाच किमान आदित्य ठाकरे यांनी तरी सौनिक समितीचा अहवाल वाचावा. कांजूरमार्ग कारशेडबाबत या समितीने काय म्हटलं याचा अभ्यास करावा, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना दिला. (devendra fadnavis reaction on Metro car shed project at Mumbai’s Kanjur Marg)
कांजूरमार्ग कारशेडप्रकरणी कोर्टाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा निर्णय दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना हा सल्ला दिला. आदित्य ठाकरे नवीन आहेत. नवे मंत्री आहेत. त्यांनी जनहितासाठी काम करावं. त्यांच्याच सरकारने सौनिक समिती स्थापन केली होती. या चार सदस्यांच्या समितीने अहवाल दिला आहे. त्याचा आदित्य यांनी अभ्यास करावा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला. आदित्य ठाकरे यांनी कांजूरमार्गप्रकरणी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. त्याने काय फरक पडणार आहे? सत्य तर बदलता येणार नाही. त्यामुळे सत्य स्वीकारून राज्य सरकारने पुढे गेलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, पक्षप्रमुख नाहीत
कांजूरमार्ग कारशेडप्रकरणी जेवढा उशीर केला जाईल, तेवढा खर्च वाढणार आहे. त्यामुळे मुंबईकरांवरच त्याचा आर्थिक भार येणार असल्याने राज्य सरकारने आपला ईगो सोडून द्यावा आणि जनतेचं नुकसान करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. उद्धव ठाकरे हे एखाद्या पक्षाचे प्रमुख नाहीत. ते मुख्यमंत्री आहेत. एका संविधानिक पदावर आहेत. त्यामुळे त्यांना कायदेशीरबाबी समजून घेऊनच पुढे जावे लागेल, असा चिमटाही त्यांनी काढला.
इगोचा प्रश्न न करता आरेत काम सुरू करा: फडणवीस
कांजूर कारशेडप्रकरणी राज्य सरकारला कोर्टाने चपराक लगावली आहे. त्यामुळे सरकारने इगोचा प्रश्न न करता आरेत काम सुरू करावं, सौनिक समितीचा अहवाल मान्य कारावा. राज्य सरकारने आरेत तात्काळ बांधकाम सुरू करावं. आम्ही कोणतीही टीका करणार नाही. उलट सरकारच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अधिकाऱ्यांनी चुकीचं ब्रिफिंग केल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी कार कारशेडच्या कामात मिठाचा खडा टाकू नये असं म्हटलं होतं, पण ते स्वत:च या कामात मिठाचा खडा टाकण्याचं काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली. हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच आरेत काम सुरू करण्यात आलं होतं. त्यासाठी शंभर कोटींचं कामही केलं आहे. पण सरकारने केवळ अहंकारापोटी निर्णय फिरवून कांजूरला कारशेड हलविण्याचा आततायी निर्णय घेतल्याची टीकाही त्यांनी केली.
आदित्य यांनी राजीनामा द्यावा: सोमय्या
कांजूर कारशेड प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवण्याचे आदेश दिले. तसेच परिस्थिती जैसे थे ठेवण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहेत. हे आदेश देतानाच कोर्टाने येत्या फेब्रुवारीत या प्रकरणावर अंतिम सुनावणी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आदित्य यांच्या अट्टाहासापोटीच कांजूरमार्गला कारशेड हलविण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे मेट्रो प्रकल्पाला खिळ बसल्याचा दावा करतानाच मेट्रोमुळे मुंबईकराचं पाच हजार कोटींचं नुकसान झाल्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही सोमय्या यांनी केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मेट्रोच्या प्रकल्पावरून भाजपने कधीही राज्य सरकारला कोंडीत पकडले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हम करे सो कायदा या उक्तीप्रमाणे वागत होते. त्यांनीच हा प्रकल्प आरेतून कांजूरला नेला. केवळ अहंकारातून हा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईकरांना मेट्रोसाठी पाच वर्षे वाट पाहावी लागणार असून पाच हजार कोटींचा अतिरिक्त भुर्दंडही सोसावा लागणार आहे. मात्र, कोर्टाने आज सरकारला चपराक लगावली असून आता तरी सरकारने त्यातून बोध घ्यावा, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे. (devendra fadnavis reaction on Metro car shed project at Mumbai’s Kanjur Marg)
Hon’ble HC has granted a stay to Kanjurmarg work. We await the detailed written order to decide the future course of action. This land is crucial for Metro Line 6, 4 and 14, apart from 3, as it will save almost ₹5500 crores of Govt and be a nodal point for 1 crore citizens.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 16, 2020
कांजूरमार्गची जागा 1 कोटी लोकांसाठी नोडल पॉईंट: आदित्य
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या कामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आम्ही आदेशाच्या प्रतची वाट पाहात आहोत. त्यात कोर्टाने नेमकं काय म्हटलं हे पाहूनच पुढचा निर्णय घेतला जाईल, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. कांजूरच्या जागेमुळे सरकारचे 5500 कोटी रुपये वाचणार आहेत. या कारशेडमुळे 1 कोटी लोकांना फायदा होणार असून कांजूरची जागा मेट्रो लाईन 6, 4 आणि 14साठी अत्यंत महत्त्वाची असल्याचा दावाही त्यांनी केला. कांजूरमार्गची जागा एक कोटी लोकांसाठी नोडल पॉईंट असल्याचंही त्यांनी सांगितलं. (devendra fadnavis reaction on Metro car shed project at Mumbai’s Kanjur Marg)
आरे कारशेड : राज्य सरकारने आरेमध्ये बांधकाम सुरु करावं, आम्ही पाठिंबाच देऊ, कोणीही जिंकलं-हरलं असं म्हणणार नाही, मुंबईकर जिंकावेत, सरकारने अभ्यास केला पाहिजे, अहवालाचं वाचन केलं पाहिजे : देवेंद्र फडणवीस https://t.co/atVRNYeisi pic.twitter.com/hcohiuYCeI
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 16, 2020
संबंधित बातम्या:
मेट्रो कारशेडचा प्रकल्प बारगळणार?, कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचे आदेश
मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच; आदित्य ठाकरेंचा दावा
भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी एकेकाळी दिलेलं शपथपत्र कसं नाकारता?, राजीव सातव यांचा केंद्राला सवाल
‘मेट्रोचं काम थांबवण्यासाठी भाजपचं कटकारस्थान’, कारशेडच्या वादावरुन नवाब मलिकांचा गंभीर आरोप