मुंबईशी कनेक्शन असलेली व्यक्ती राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी?; वसुंधरा राजे यांचं काय होणार?
राजस्थानमध्ये सत्तांतर झालं आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आली आहे. राजस्थानमध्ये भाजप 115 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसला अवघ्या 69 जागा मिळाल्या आहेत. दर पाच वर्षांनी काँग्रेसमध्ये सत्ता बदल होत असतो. यावेळीही हा बदल झाला आहे. राजस्थानात भाजप सत्तेत येत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्यानंतर आता भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
जयपूर | 3 डिसेंबर 2023 : राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव होताना दिसत आहे. या राज्यात भाजपला मोठं यश मिळालं आहे. भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा रंगली आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र वसुंधरा राजे यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी आणखी एक नाव चर्चेत आलं आहे. ती व्यक्तीही राजघराण्यातील असून तिचाही राजस्थानमध्ये दबदबा आहे.
दीया कुमारी या भाजपच्या खासदार आहेत. त्यांना भाजपने जयपूरच्या विद्याधर नगर विधानसभा मतदारसंघातून उतरवले होते. या मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसचे बडे नेते सीताराम अग्रवाल यांना पराभूत केलं आहे. भाजपने खासदार असलेल्या दीया कुमारी यांना विधानसभेत उतरवल्यापासून त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेतलं जात आहे. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून त्या प्रचंड चर्चेत आहेत.
राजघराण्यात जन्म
2013मध्ये दीया कुमारी या सवाईमाधोपूरमधून विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यानंतर त्या राजसमंद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. आता परत त्यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं होतं. गुजरातचे एक शासक महाराज मान सिंह द्वितीय यांची त्या नात आहेत. दीया कुमारी या महाराजा सवाई भवानी सिंह आणि महाराणी पद्मिनी देवी यांची एकुलती एक कन्या आहे. दीया कुमारी यांचे वडील भवानी सिंह हे भारतीय सैन्यात अधिकारी पदावर होते. तसेच ते हॉटेलिअरही होते. दीया कुमारी यांचा जन्म 30 जानेवारी 1971चा आहे.
मुंबईशी कनेक्शन
दीया कुमारी यांचं शिक्षण दिल्लीच्या मॉर्डन स्कूल आणि मुंबईतील जीडी सोमानी मेमोरियल स्कूलमधून झालं. त्यामुळे दीया कुमारी यांचं या अर्थाने मुंबईशी कनेक्शन आहे. त्यांनी जयपूरच्या महाराणी गायत्री देवी गर्ल्स पब्लिक स्कूलमध्येही शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये डेकोरेटिव्ह आर्ट्सचा कोर्स केला होता.
राजकारणाची समज
दीया कुमारी यांची राजकीय समज चांगली आहे. त्यांनी 2013मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून सवाई माधोपूरमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी 2019मध्ये राजसमंद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्या निवडूनही आल्या होत्या. त्या विद्यमान खासदार आहेत. तसेच राजस्थानच्या भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश प्रभारीही आहेत. राजकारणा व्यतिरिक्त त्या स्वत:ची एनजीओही चालवतात. या शिवाय त्यांच्या शाळा आहेत. तसेच हॉटेल व्यवसायही आहे.