Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थकवा, डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला; सर्व बैठका रद्द
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याासून ते सत्ता स्थापन करेपर्यंत त्यांची धावपळ सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे राज्यात ठिकठिकाणी सत्कार झाले. त्यानिमित्ताने त्यांना फिरावं लागलं. तसेच मंत्रालयात बैठकांवर बैठका घेऊन अनेक प्रश्न मार्गी लावावे लागले.
मुंबई: राज्यात सत्ता आल्यापासून सातत्याने दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांना थकवा जाणवू लागला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्याने शिंदे यांनी सर्व त्यांचे सर्व प्रशासकीय आणि राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस एकनाथ शिंदे कोणतेही कार्यक्रम घेणार नसल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या काळात ते सामान्य नागरिकांना भेटणार नसल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, मंत्रालय (mantralaya) किंवा त्यांच्या निवासस्थानातून ते कामकाज पाहणार असल्याचं सांगितलं जातय. शिंदे यांना थकवा जाणवत असला तरी चिंता करण्याचं कारण नसल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान, शिंदे यांना आराम करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिल्याने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (cabinet expansion) लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याासून ते सत्ता स्थापन करेपर्यंत त्यांची धावपळ सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे राज्यात ठिकठिकाणी सत्कार झाले. त्यानिमित्ताने त्यांना फिरावं लागलं. तसेच मंत्रालयात बैठकांवर बैठका घेऊन अनेक प्रश्न मार्गी लावावे लागले. त्यानंतर त्यांना वारंवार दिल्लीतही जावं लागलं. विशेष म्हणजे रात्री अपरात्रीही त्यांनी दिल्लीत जावं लागलं. त्यामुळे झोप पुरेशी मिळू शकली नाही. ते होत नाही तोच त्यांनी राज्यात दौरे सुरू केले. या निमित्ताने त्या त्या जिल्ह्यातील पूर स्थितीचा आढावा घेतानाच राजकीय सभांनाही ते संबोधित करत होते. परिणामी त्यांची दगदग झाली. त्यामुळे त्यांना थकवा आला असावा असं सांगण्यात येतं.
विस्तार लांबणार?
दरम्यान, उद्या 5 ऑगस्ट रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सर्व कार्यक्रमही रद्द केले आहेत.
फडणवीस दिल्लीत
दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले आहेत. आपले सर्व कार्यक्रम रद्द करून फडणवीस दिल्लीला गेले आहेत. राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही. कोर्टाने सुनावणी पुढे ढकलल्यानंतर फडणवीस दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा करायला फडणवीस दिल्लीत गेल्याचं सांगितलं जात आहे.