Sanjay Raut : संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक, किती अधिकाऱ्यांकडून तपास?; बंगल्याभोवती सुरक्षा रक्षकांचा पहारा
ही तपास आणि शोध प्रक्रिया असल्याचे सांगण्यात येत आहे. राऊत आणि त्यांचे आमदार भाऊ सुनील राऊत हे दोघेही त्यांच्या भांडूप येथील ‘मैत्री’ बंगल्यात उपस्थित आहेत. पत्रावाला चाळ प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची ईडीची टीम चौकशी करत आहे.
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी ईडीची (ED) धाड पडली आहे. गोरेगावाच्या पत्राचाळ प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली आहे. सकाळी 7 वाजताच ईडीचं पथक राऊतांच्या घरी पोहोचलं. एसआरपीएफच्या जवानांसह या अधिकाऱ्यांनी राऊतांच्या घरावर धडक दिली. गेल्या दोन तासापासून राऊत यांच्या घराची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. काही कागदपत्रं तपासण्यात येत आहेत. तसेच राऊतांची चौकशीही करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ही कारवाई बराच वेळ चालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राऊत यांची चांगलीच अडचण झाली आहे. शिवसेनेचे (shivsena) आमदार आणि संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊतही राऊत यांच्य मैत्री बंगल्यावर हजर झाले आहेत. सीआरपीएफच्या जवानांनी बंगल्याचे गेट लावून घेतले असून कुणालाही आतमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे. ईडीचे अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहे. या सुरक्षा रक्षकांनी राऊत यांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवला असून कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ईडीचे 10 ते 12 अधिकारी संजय राऊत यांच्या घरी आहेत. तसेच सात ते आठ सीआरपीएफचे जवान आणि स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सुनील राऊतही बंगल्यात उपस्थित
ही तपास आणि शोध प्रक्रिया असल्याचे सांगण्यात येत आहे. राऊत आणि त्यांचे आमदार भाऊ सुनील राऊत हे दोघेही त्यांच्या भांडूप येथील ‘मैत्री’ बंगल्यात उपस्थित आहेत. पत्रावाला चाळ प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची ईडीची टीम चौकशी करत आहे. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात 55 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. त्याचा तपास सुरू झाल्यानंतर हे 55 लाख राऊत यांच्यामार्फत परत करण्यात आले होते. मात्र ही रक्कम राऊत कुटुंबीयांच्या मालकीची असल्याचा ईडीचा आरोप आहे. त्या अनुषंगाने ही कारवाई होत असलेयाचं बोललं जातंय.
शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
राऊत यांच्या घरावर ईडीने छापे मारल्याची माहिती मिळताच शिवसैनिकांनी राऊत यांच्या बंगल्याबाहेर एकच गर्दी केली आहे. शिवसैनिकांनी राऊत यांच्या बंगल्याबाहेर जमून ईडी आणि भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. भाजप क्या करती है, ईडी को आगे करती है, संजय राऊत संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा शिवसैनिकांनी द्यायला सुरुवात केली आहे. शिवसैनिकांनी राऊत यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. तसेच राऊतांचा छळ करण्यासाठीच ही कारवाई होत आहे, असा दावा शिवसैनिकांनी केला आहे.