एकनाथ खडसे, उदय सामंत एकसोबत शरद पवारांच्या भेटीला, भेटीनंतर सामंत काय म्हणाले?
एकनाथ खडसे आणि उदय सामंत यांनी एकसोबत पवारांची भेट घेतली. या भेटीबाबत सामंत यांनी स्पष्टीकरण दिलंय.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येऊन गेले. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. त्यानंतर आता भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही आज पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत होते. फडणवीसांनंतर खडसे यांनी पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, उदय सामंत यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. (Eknath Khadse and Minister Uday Samant met NCP President Sharad Pawar)
उदय सामंत यांचं स्पष्टीकरण
एकनाथ खडसे आणि आपण एकत्र पवारांना भेटण्यासाठी गेलो नव्हतो. शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूर करण्यासाठी आपण गेलो होतो. त्याचबरोबर एशियाटिक लायब्ररी आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयासंर्भात काही सूचना मला करण्यात आल्या होत्या. त्याबाबत माहिती देण्यासाठी आपण पवारांची भेट घेतल्याचं सामंत यांनी सांगितलं. त्याचबरोबर आपण पोहोचलो त्यावेळी खडसेही आले. जी चर्चा झाली ती त्यांच्या प्रकृतीसंदर्भात आणि त्यांनी मला दिलेल्या कामाबाबत झाल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली.
फडणवीसांनंतर खडसेही पवारांच्या भेटीला
शरद पवार यांच्यावर नुकत्याच 3 शस्त्रक्रिया पार पडल्या. त्यानंतर पवार पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाले आहेत. शस्त्रक्रिया झाल्यानंतर पवारांना भेटण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचा राबता पाहायला मिळतोय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नुकतीच पवारांची भेट घेतली. या भेटीवरुन राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्याबाबत स्वत: फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्टीकरण देत ही सदिच्छा भेट होती असं सांगितलं. त्यानंतर आता एकनाथ खडसे आणि उदय सामंत यांनीही पवारांची भेट घेतली आहे.
आज मुंबईत @NCPspeaks चे अध्यक्ष आणि देशाचे नेते आदरणीय श्री शरदरावजी पवार @PawarSpeaks साहेबांची सदिच्छा भेट घेतली. शास्त्रक्रियेपश्चात त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. @samant_uday जी उपस्थित होते. pic.twitter.com/wTSgPug3jG
— Eknath Khadse (@EknathGKhadse) June 2, 2021
फडणवीस – पवार भेट
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही 31 मे रोजी शरद पवार यांची भेट घेतली होती. पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथे जाऊन फडणवीस शरद पवारांना भेटले. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली होती. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवारजी यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. 31 मे रोजी एकीकडे महाविकास आघाडीचे सर्व नेते मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनात होते. तर दुसरीकडे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा रंगली होती.
Met Former Union Minister & Senior leader Shri Sharad Pawar ji at his residence in Mumbai this morning. This was courtesy meeting. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवारजी यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/eqjabCHMh7
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 31, 2021
संबंधित बातम्या :
शरद पवार-देवेंद्र फडणवीस भेटीवरून तर्कवितर्कांना उधाण; नवाब मलिक म्हणतात…
देवेंद्र फडणवीस काल शरद पवारांच्या निवासस्थानी, आज थेट एकनाथ खडसेंच्या घरी!
Eknath Khadse and Minister Uday Samant met NCP President Sharad Pawar