Eknath Khadse : शेती गेली, जनावरे वाहून गेली, माणसं दगावली, पण 15 दिवस झाले तरी सरकार जेवणावळीतच व्यस्त; नाथाभाऊंचा हल्लाबोल
Eknath Khadse : एकनाथ खडसे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत माझी अद्याप आमच्या कुठल्याही वरिष्ठांशी चर्चा झालेली नाही. मला याबाबत विचारण्यात आलेले नाही.
जळगाव: राज्यात एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचं सरकार स्थापन झालं आहे. पण गेल्या 15 दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक कामे रखडली आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. राज्यात पुराचा हाहा:कार आहे. गाव वाहून गेली आहेत. लोक निर्वासित झाली आहेत. जनावरे वाहून गेली आहेत. शेती पुराने वाहून गेली आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांचे अश्रू पुसण्यासाठी सरकारकडून कोणीही गेलेला नाही. त्यामुळे पूरग्रस्तांना तातडीने मदत केली पाहिजे. पण सरकारकडे संवेदनशीलता राहिली नाही. 15 दिवस झाले हे सरकार जवेवणावळीत व्यस्त आहे. फाईव्हस्टार हॉटेलमद्ये आमदारांना घेऊन जाणं, जेवण देणं सुरू आहे. तिकडे फाईव्हस्टारमध्ये जेवण द्यायचे तर द्या. पण सर्वसामान्यांना दिलासा कोण देणार? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे.
राज्यात अनेक जिल्ह्यात पालकमंत्री नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. चाललय काय? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ग्रामीण भागातील जनतेचं काही घेणंदेणं नसल्याचे दिसते. मंत्रिमंडळाचा विस्तारचं अद्याप झाला नसल्याने जनतेला दिलासा कोण देईल?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना केला.
ज्यांची संख्या अधिक त्यांचा विरोधी पक्षनेता
एकनाथ खडसे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत माझी अद्याप आमच्या कुठल्याही वरिष्ठांशी चर्चा झालेली नाही. मला याबाबत विचारण्यात आलेले नाही. मात्र ज्या पक्षाचे आमदार जास्त त्याचाच विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता होईल, असं त्यांनी सांगितलं.
राज्य दोघांच्या भरवश्यावर, जनता वाऱ्यावर
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणावर शिक्कामोर्तब केला होता. तरीही शिंदे सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामकरण करून क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला आहे. पंधरा दिवसापासून मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेच सरकार चालवत आहेत. या दोघांच्या भरवश्यावर राज्य चालू आहे. जनता वाऱ्यावर आहे, असं ते म्हणाले.