Eknath Shinde : आधी उद्धव ठाकरेंच्या प्रतोदनं आदेश काढले आता एकनाथ शिंदेंच्या, कायदा कुणाच्या बाजूनं?
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी मुख्यप्रतोद पदावरून सुनील प्रभू यांना हटवलं आहे. त्यांच्याजागी भरत गोगावले यांची मुख्यप्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांना तसे पत्रंही पाठवलं आहे.
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यानी पक्षाविरोधात बंड पुकरालं आहे. त्यानंतर शिंदे आणि शिवसेनेत चेकमेटचं राजकारण सुरू झालं आहे. शिंदे यांनी बंड केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी शिंदेंची गटनेतेपदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर शिंदे यांनी त्याला आव्हान दिलं. संख्याबळ नसताना मला गटनेतेपदावरून कसे हटवू शकता? असा सवाल करतानाच आमच्याकडे संख्याबळ आहे. त्यामुळे गटनेता मीच आहे, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर शिवसेनेचे मुख्यप्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी केला. शिवसेनेच्या (shivsena) संध्याकाळच्या बैठकीला आला नाही तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा या प्रभू यांनी दिला होता. मात्र, शिंदे यांनी मुख्यप्रतोद पत्रावरून प्रभू यांची हकालपट्टी केली आहे. भरत गोगावले यांची मुख्यप्रतोपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचं शिंदे यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यप्रतोद पदावरून सुनील प्रभू यांना हटवलं आहे. त्यांच्याजागी भरत गोगावले यांची मुख्यप्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांना तसे पत्रंही पाठवलं आहे. या पत्रावर एकूण 34 आमदारांच्या सह्या आहेत. गटनेता म्हणून माझ्या अधिकारात ही नियुक्ती करण्यात येत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
दोन नियुक्त्या
या पत्रात दोन नियुक्त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. एक म्हणजे एकनाथ शिंदे हेच गटनेते असतील असा ठराव करण्यात आला आहे. त्याला भरत गोगावले आणि आणि महेश शिंदे यांनी अनुमोदन दिलं आहे. तर प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याला संजय रायमुलकर यांनी अनुमोदन दिलं आहे. या पत्रात 34 आमदारांच्या सह्या आहेत.
कायदा शिंदेंच्या बाजूला
विधिमंडळाच्या नियमानुसार सध्या तरी कायदा शिंदे यांच्या बाजूने असल्याचं दिसत आहे. शिंदे यांच्याकडे आमदारांचं पुरेसं संख्याबळ आहे. त्यांच्याकडे 34 आमदार आहेत. म्हणजे दोन तृतियांश आमदार त्यांच्याकडे आहे. या सर्व आमदारांच्या त्या पत्रावर सह्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात आपल्याकडे 46 आमदारांचा पाठिंबा असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेनेकडे 20च्या आत आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे संख्याबळानुसार सध्या तरी कायदा शिंदे यांच्या बाजूने असल्याचं दिसून येत आहे.