Eknath Shinde | फोनवर बोलत हसत फेरफटका मारला, एकनाथ शिंदे 6 दिवसांनंतर माध्यमांसमोर! काय सांगतेय बॉडी लँग्वेज?
शिंदे गटातील सर्व आमदार आनंदात आहेत, हे एकनाथ शिंदे यांनी याआधीही सांगितलं आहे. माध्यमांना फोनवर त्यांनी तशी प्रतिक्रियाही दिली आहे. मात्र आजच त्यांना अजूनही हे ठासून सांगण्याची वेळ का आली, यावर आता चर्चा सुरु आहे.
मुंबईः गुवाहटीत असलेले शिवसनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज तब्बल सहा दिवसांनंतर माध्यमांसमोर आले. गुवाहटीतील (Guwahati) हॉटेल रेडिसन ब्लू येथे एकनाथ शिंदे यांच्यासह 40 पेक्षा जास्त शिवसेना (ShivSena MLA) आणि अपक्ष आमदारांचं वास्तव्य आहे. मागील दोन दिवसांपासून शिंदे गटातील दीपक केसरकर हेच या गटाचे निर्णय आणि भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट करत आहेत. मात्र आज प्रथमच एकनाथ शिंदे हॉटेलच्या बाहेर आले. बाहेर आल्यानंतरही ते बराच वेळ फोनवर बोलत इकडून तिकडे फेरफटका मारत होते. आपण अशा प्रकारे बाहेर आल्यानंतर माध्यम प्रतिनिधी आपल्याला बोलावतील, ही अपेक्षा त्यांना असावी. त्यामुळेच ते गेटजवळ अशा रितीने समोर आले. मात्र प्रतिनिधींनी त्यांना सध्याच्या स्थितीवर प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी फार काही स्पष्ट बोलण्यास नकार दिला.
… तर बाहेर कशासाठी आले?
फोनवर बोलत बोलत एकनाथ शिंदे गेटपर्यंत आले तर प्रतिनिधी त्यांना बोलावणारच हे त्यांनाही माहिती होते. पण माईक समोर धरल्यानंतर मी काहीही बोलणार नाही. आमचे प्रवक्ते दीपक केसरकर सविस्तर भूमिका मांडत आहेत, असंच एकनाथ शिंदेंनी सांगितलं. शिंदेंना स्पष्ट बोलायचं नव्हतं तर अशा रितीने ते गेटपर्यंत आलेच कशाला? शिंदे गटात नक्की काहीतरी वेगानं हालचाली सुरु आहेत, फोनवर बोलणं सुरु आहे.. महत्त्वाची चर्चा सुरु आहे.. असं काहीतरी त्यांना दाखवायचं होतं? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.
‘शिवसेना खोटं बोलतेय’
आधी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देणारे एकनाथ शिंदे शेवटी बोललेच आणि त्यानंतर त्यांनी प्रतिक्रियाही दिली. शिवसेनेकडून वारंवार दावा केला जातोय की आमदारांवर दबाव आहे. मात्र इथे असलेले 50 आमदार आनंदात आहेत. शिवसेना जो दावा करतेय, त्यांनी एकेकाचं नाव समोर येऊन सांगावं, असं आव्हान एकनाथ शिंदे यांनी केलं.
आनंदात आहोत, हे पुन्हा का सांगावं लागलं?
शिंदे गटातील सर्व आमदार आनंदात आहेत, हे एकनाथ शिंदे यांनी याआधीही सांगितलं आहे. माध्यमांना फोनवर त्यांनी तशी प्रतिक्रियाही दिली आहे. मात्र आजच त्यांना अजूनही हे ठासून सांगण्याची वेळ का आली, यावर आता चर्चा सुरु आहे. आम्ही शिवसेनेतच असून शिवसेना पुढे नेत आहोत, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.