Maharashtra Floor Test: गुवाहटी ते गोवा, तिथून मुंबई, बंडखोर आमदार बहुमत चाचणीला कसे पोहोचणार? इनसाईड स्टोरी
30 जून रोजी बहुमत चाचणीसाठी भाजपचे आमदार आणि शिंदेसेनेचे आमदार एकाच वेळी, एकाच ठिकाणाहून विधानभवनाकडे रवाना होतील. महाराष्ट्राच्या सत्तानाट्यातील अत्यंत महत्त्वाच्या दिवसासाठी हा मेगा प्लॅन आखण्यात आला आहे.
मुंबईः मागील आठ दिवसांपासून महाराष्ट्राबाहेर ठेवलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील बंडखोर आमदारांना (Rebel MLA) आता बहुमत चाचणीसाठी (Floor test) महाराष्ट्रात आणण्याचं मोठं आव्हान आहे. शिवसेनेच्या कोणत्याही आवाहनाला किंवा धमक्यांना बळी न पडलेल्या आमदारांना बहुमत चाचणीपर्यंत शिवसेना नेत्यांपासून दूर ठेवण्यासाठी मोठी खबरदारी घेतली जात आहे. यासाठी भाजप आणि शिंदेसेनेच्या वतीने एक मेगा प्लॅन आखल्याची विश्वसनीय माहिती TV9 कडे आली आहे. तसेच आज आणि उद्या आसाममध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार महाराष्ट्रातही आज पोहोचणार नाहीत आणि आसामही तत्काळ सोडतील, यासाठी विचारपूर्वक नियोजन करण्यात आले आहे. उद्या 30 जून रोजी बहुमत चाचणी होणार आहे. तत्पूर्वी आज बुधवारी संध्याकाळी आमदारांना गुवाहटीवरून गोव्यात आणलं जाईल. तेथून उद्या सकाळी त्यांना मुंबईत आणलं जाईल. त्यानंतर सकाळच्या वेळी आमदार थेट बहुमत चाचणीसाठी पोहोचतील. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईत ज्या ठिकाणी हे आमदार थांबणार आहेत, त्याच ठिकाणी भाजपच्या आमदारांनाही बोलावून घेण्यात आलं आहे. म्हणजेच 30 जून रोजी बहुमत चाचणीसाठी भाजपचे आमदार आणि शिंदेसेनेचे आमदार एकाच वेळी, एकाच ठिकाणाहून विधानभवनाकडे रवाना होतील. महाराष्ट्राच्या सत्तानाट्यातील अत्यंत महत्त्वाच्या दिवसासाठी हा मेगा प्लॅन आखण्यात आला आहे.
गुवाहटीतून थेट मुंबई का नाही?
आसामची राजधानी गुवाहटी येथे सध्या एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार वास्तव्यास आहेत. मात्र मागील काही दिवासंपासून आसाममध्ये पूरस्थिती उद्भवली आहे. आज आणि उद्या तर आसाममध्ये अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी गुवाहटीहून थेट मुंबईत विमानाने यायचं असं नियोजन केलं आणि पावसामुळे विमानाचं उड्डाण झालं नाही तर, आमदार बहुमत चाचणीसाठी विधानभवनापर्यत पोहोचू शकणार नाहीत. तसेच आमदारांना शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्कात येण्यापासून रोखण्याचंही आव्हान आहे. त्यामुळेच शिंदेसेना आणि भाजपच्या वतीने असा मेगाप्लॅन करण्यात आल्याचं म्हटलं जातंय.
काय आहे मेगा प्लॅन?
- आज बुधवारी दुपारी 3.30 वाजता गुवाहटीतून एकनाथ शिंदेंसह सर्व आमदार गोव्याकडे रवाना होतील.
- बुधवारी संध्याकाळी 5.30 ते 6.30 दरम्यान बंडखोर आमदार गोव्यात उतरतील. बुधवारचा गोव्यातील मुक्काम हा ताज हॉटेलमध्ये असेल.
- गुरुवारी सकाळी 7 ते 8 वाजेच्या सुमारास गोव्याहून सर्व आमदार मुंबईच्या दिशेने विमानाने निघतील.
- गुरुवारी सकाळी मुंबई विमानतळावरून सर्व आमदार हॉटेल ताज येथे जातील.
- मुंबईतील हॉटेल ताजमध्येच भाजपच्या सर्व आमदारांना बोलावून घेण्यात आलं आहे.
- मुंबईतल्या हॉटेल ताजमध्येच भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार एकत्र नाश्ता करतील.
- बहुमत चाचणी सकाळी 11 वाजता आहे. त्याआधी भाजप आणि शिंदेसेना विधानभनाकडे रवाना होईल..