Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा मंत्रिपदांचा फॉर्म्युला शहांना कबुल?, चार तासांच्या खलबतानंतर सूत्रं ठरलं?; शिंदे आज मोदी, राष्ट्रपतींनाही भेटणार
Eknath Shinde : अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत शिंदे गटाला 10 कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्रिपद देण्यात येणार आहे. तर भाजपला 28 मंत्रिपदे देण्यात येणार आहे.
नवी दिल्ली: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) या दोन्ही नेत्यांनी काल दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांची भेट घेतली. या चार तासाच्या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बंडखोर आमदारांचे निलंबन रोखण्यासाठी कोर्टात करण्यात येणाऱ्या युक्तिवादापासून ते राज्यातील मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. शिंदे गटातील अपक्ष आमदारांना आणि ठाकरे सरकारमधील सर्व मंत्र्यांना मंत्रिपदे देण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचं सांगितलं जातं. या बैठकीत मंत्रिमंडळातील एकूण 43 मंत्र्यांपैकी शिंदे गटाने 10 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रिपदांची मागणी केल्याची केली आहे. तर भाजपला 28 मंत्रिपदे देण्याचं या बैठकीत ठरल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच शिंदे गटाला कोणती खाती द्यायची यावरही चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. गृहखातं फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्त आहे. मात्र, त्याला अद्याप भाजपमधून कोणीही दुजोरा दिलेला नाही.
अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत शिंदे गटाला 10 कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्रिपद देण्यात येणार आहे. तर भाजपला 28 मंत्रिपदे देण्यात येणार आहे. तसा प्रस्तावच अमित शहा यांच्याकडे दोन्ही नेत्यांकडून सादर करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. या प्रस्तावाबाबत शहा अनुकूल असले तरी त्यावर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलं नसल्याचंही सांगण्यात येतं.
कायदेतज्ज्ञांचीही उपस्थिती
दरम्यान, शहा, शिंदे आणि फडणवीस यांच्यात काल चार तास चर्चा झाली. मध्यरात्री 2 वाजेपर्यंत या तिन्ही नेत्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. मध्यरात्री दोन वाजता शिंदे आणि फडणवीस शहा यांच्या घरातून बाहेर पडले. हे दोन्ही नेते शहा येथील घरी एकत्रं आले नाहीत. फडणवीस आधी शहा यांच्या घरी आले होते. त्यानंतर शिंदे आले. बाहेर पडताना मात्र वेगवेगळ्या गेटमधून बाहेर पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटप, तसेच 11 तारखेला होणारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी यावर चर्चा झाल्याचं वृत्त आहे. या बैठकीला कायदेतज्ज्ञही उपस्थित होते. 11 जुलैच्या सुनावणीसंदर्भात कायदेतज्ज्ञांचा यावेळी सल्ला घेण्यात आल्याचं सांगितलं जातं.
पंतप्रधान, राष्ट्रपतींना भेटणार
शहा यांच्यासोबत चार तास चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस आज भाजपच्या नेत्यांना दोन टप्प्यात भेटणार आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस मुख्यमंत्री शिंदे हे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून करणार आहेत. नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर आज सायंकाळीच ते खासगी विमानाने थेट पुण्याला रवाना होणार आहेत. तिथून पुढे पंढरपूर इथे शासकिय पुजेसाठी जाणार आहेत.
शिंदे आणि फडणवीस यांचे आजचे दिल्लीतील कार्यक्रम
सकाळी 10.30 वाजता राष्ट्रपतींची भेट सकाळी 11.30 वाजता जे पी नड्डांची भेट दुपारी 12 वाजता राजनाथ सिंग यांची भेट दुपारी 4.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट दुपारी 1 ते 4 दरम्यान पत्रकार परिषद ( शक्यता) सायंकाळी 6 वाजता दिल्ली विमानतळ