Eknath Shinde: पावला पावलावर पोलीस, रस्ते ब्लॉक, कडेकोट बंदोबस्तात बंडखोर आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला
आसामला मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये त्यामुळे खबरदारी म्हणून शिवसेनेचे बंडखोर आमदार आजच गोव्याच्या दिशेने रवाना होणार आहेत.
गुवाहाटी: पावला पावलावर, प्रत्येक कोपऱ्यावर पोलीस, रस्ते ब्लॉक, कडेकोट बंदोबस्तात शिवसेनेचे बंडखोर आमदार (Shivsena Rebel MLA) कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहचले. आमदारांच्या सुरक्षेची काळजी पावलोपावली घेण्यात येत असल्याचं दिसून येतंय. 2 बसेसमधून बंडखोर आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहचले. आसामला मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये त्यामुळे खबरदारी म्हणून शिवसेनेचे बंडखोर आमदार आजच गोव्याच्या (Goa) दिशेने रवाना होणार आहेत. त्या आधी या आमदारांनी देवीच्या दर्शनासाठी कडेकोट बंदोबस्तात हजेरी लावल्याचं दिसून आलं. कामाख्या देवीच्या दर्शनानंतर बंडखोर आमदार गुवाहाटीच्याच (Guwahati) हॉटेलमध्ये परतणार आहेत. दुपारी 3.30 च्या सुमारास आमदार गोव्याच्या दिशेनं रवाना होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य विधानसभा | सत्तेचं गणित |
---|---|
विधानसभेचे एकूण सदस्य | 288 |
दिवंगत सदस्य | 01 |
कारगृहात सदस्य | 02 |
सध्याची सदस्य संख्या | 285 |
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार | 39 |
आता सभागृहाची सदस्य संख्या | 285 |
बहुमताचा आकडा | 143 |
भाजपचं संख्याबळ | भाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172 |
मविआचं संख्याबळ | शिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111 |
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ? | भाजप (106)+ अपक्ष (27) = 133 |
शिवसेना नेत्यांपासून दूर ठेवण्यासाठी मोठी खबरदारी
मागील आठ दिवसांपासून महाराष्ट्राबाहेर ठेवलेल्या एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांनाआता बहुमत चाचणीसाठी महाराष्ट्रात आणण्याचं मोठं आव्हान आहे. शिवसेनेच्या कोणत्याही आवाहनाला किंवा धमक्यांना बळी न पडलेल्या आमदारांना बहुमत चाचणीपर्यंत शिवसेना नेत्यांपासून दूर ठेवण्यासाठी मोठी खबरदारी घेतली जात आहे. यासाठी भाजप आणि शिंदेसेनेच्या वतीने एक मेगा प्लॅन आखल्याची विश्वसनीय माहिती TV9 कडे आली आहे.
शिंदे गट बहुमत चाचणीला कसे पोहचणार
- कामाख्या देवीच्या दर्शनानंतर गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये परतणार
- दुपारी 3.30च्या सुमारास गोव्यासाठी रवाना होणार
- 5.30 ते 6.30 च्या दरम्यान गोव्यात पोहचणार
- गोव्याच्या ताज हॉटेलमध्ये आज मुक्काम
- उद्या सकाळी 8 वाजता मुंबईत येणार
- नाश्ता करून विधानभवनात दाखल होणार
- बहुमत चाचणी 11 वाजता
गुवाहटीतून थेट मुंबई का नाही?
आसामची राजधानी गुवाहटी येथे सध्या एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार वास्तव्यास आहेत. मात्र मागील काही दिवासंपासून आसाममध्ये पूरस्थिती उद्भवली आहे. आज आणि उद्या तर आसाममध्ये अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी गुवाहटीहून थेट मुंबईत विमानाने यायचं असं नियोजन केलं आणि पावसामुळे विमानाचं उड्डाण झालं नाही तर, आमदार बहुमत चाचणीसाठी विधानभवनापर्यत पोहोचू शकणार नाहीत. तसेच आमदारांना शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्कात येण्यापासून रोखण्याचंही आव्हान आहे. त्यामुळेच शिंदेसेना आणि भाजपच्या वतीने असा मेगाप्लॅन करण्यात आल्याचं म्हटलं जातंय.