Eknath Shinde : राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करु नये, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
जे फुटून गेलेले आहेत, सुदैवानं ज्यांचे आईवडील सोबत आहेत त्यांनी त्यांना सोबत घेऊन सभा घ्याव्या आणि मतं मागावी, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर टीका केलीय. शिंदे यांनीही ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करु नये, असा टोला शिंदेंनी लगावलाय.
मुंबई : राज्यात ठाकरे सरकार कोसळल्यानंतर शिंदे सरकार अस्तित्वात आलं. मात्र, या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. हाच धागा पकडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि सर्वच विरोधक शिंदे आणि फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवत आहेत. तसंच शिवसेना (Shivsena) कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? या मुद्द्यावरुनही आता रणकंदन सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. ते बंडखोर नाहीत, हरामखोर आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर शिवसेना प्रमुखांचा, माझ्या वडिलांचा फोटो लावू नका, तुमच्या हिंमतीवर मतं मिळवा. प्रत्येकाला आईवडील प्यारे असतात. जे फुटून गेलेले आहेत, सुदैवानं ज्यांचे आईवडील सोबत आहेत त्यांनी त्यांना सोबत घेऊन सभा घ्याव्या आणि मतं मागावी, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर टीका केलीय. शिंदे यांनीही ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करु नये, असा टोला शिंदेंनी लगावलाय.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. त्यांचे विचार घेऊन आम्ही चाललो आहोत आणि महाराष्ट्राच्या जनतेनं ते स्वीकारलं आहे. आम्हाला राज्यभरातून, जिल्ह्या जिल्ह्यातून मोठं समर्थन मिळत आहे. बाळासाहेब आमचे कुटुंबप्रमुख होते. बाळासाहेब आम्हाला वडिलांप्रमाणे होते. त्यांच्या आशीर्वादानेच हे सरकार स्थापन झालं. जे अडीच वर्षापूर्वी झालं पाहिजे होतं त्याची दुरुस्ती आता आम्ही करत आहोत. निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होती. सारखं खंजीर खुपसल्यची भाषा केली जाते, मी त्यावर बोलू शकतो की जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकले त्यांनी खंजीरची भाषा करु नये. पाठीत खंजीर कुणी खुपसला हे मी योग्य वेळ आली की सांगेन, असा इशाराच शिंदे यांनी ठाकरेंना दिलाय.
उद्धव ठाकरेंची नेमकी टीका काय?
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज अरविंद सावंत यांच्या नुतनीकरण झालेल्या शाखेचं उद्घाट केलं. त्यावेळी ठाकरेंनी एकनाथ शिंदे, त्यांच्या गटातील आमदार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. सामान्यांना असामान्य केलं होतं. ते आता निघून गेले. आता पुन्हा एकदा आपल्याला सामान्यातून असामान्य लोक घडवायचे आहे. 56 वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना झाली. पिढ्यामागून पिढ्या गेल्या. पण त्यावेळी आपल्या मनगटात ताकद आहे हे बाळासाहेबांनी सांगितलं नसतं तर ही मनगटं पिचून गेली असती. या मनगटात ताकद ज्या शिवसेनेनं दिली ते आता शिवसेना गिळायला निघाले आहेत. याचं कारण स्पष्ट आहे, त्यांच्या मागची जी ताकद आहे, महाशक्ती, कळसूत्री बाहुल्यांचे संचालक त्यांना शिवसेना संपवायचीय. त्यांना मुंबईवरुन आपला भगवा हटवायचा आहे आणि त्यांचा ठसा उमटवायचा आहे. पण ज्या ज्या वेळी संकटं आली त्या संकटांना मातीत गाडून शिवसेना पुन्हा उभी राहली, असा इशाराच ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंना दिलाय.
इतकंच नाही तर उद्धव ठाकरे म्हणाले की, आता आदित्य फिरतोय, मी ही पुढच्या महिन्यापासून राज्याचा दौरा करणार आहे. त्यांना एक तर शिवसेना संपवायची आहे. ती संपवताना त्यांना ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं आहे. ते बंडखोर नाहीत, हरामखोर आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर शिवसेना प्रमुखांचा, माझ्या वडिलांचा फोटो लावू नका, तुमच्या हिंमतीवर मतं मिळवा. प्रत्येकाला आईवडील प्यारे असतात. जे फुटून गेलेले आहेत, सुदैवानं ज्यांचे आईवडील सोबत आहेत त्यांनी त्यांना सोबत घेऊन सभा घ्याव्या आणि मतं मागावी, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय.