BIG BREAKING | देशाच्या राजकारणात भूकंप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. हा शरद पवार यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का मानला जातोय. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राष्ट्रवादी पक्ष काय भूमिका मांडतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या तीनही पक्षांचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1998 साली झाली होती. तेव्हापासून सलग 15 वर्ष हा पक्ष राज्यात सत्तेत होता. तसेच या पक्षाने देशाच्या राजकारणातही ठसा उमटवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकेकाळी देशाचे केंद्रीय कृषीमंत्रीदेखील होते. असं असताना निवडणूक आयोगाने आज राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत घेतलेल्या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी काळातील राजकारण आणि निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या तीनही पक्षांची राष्ट्रीय मान्यता रद्द केल्याचा अहवाल दिल्याचं वृत्त पीटीआयच्या हवालाने समोर आलं आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला एकप्रकारे प्रमोशन दिल्यासारखा निर्णय घेतला आहे. कारण निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला केंद्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे.
दुसरीकडे महाराष्ट्राचा विचार केला तर शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. राष्ट्रवादीचे लोकसभा आणि राज्यसभेत खासदार आहेत. याशिवाय नागालँडमध्ये त्यांचे अनेक उमेदवार निवडून आले आहेत. पण असं असताना निवडणूक आयोगाने त्यांची केंद्रीय पक्ष म्हणूनची मान्यता रद्द केली आहे.
राष्ट्रवादीला एवढा मोठा झटका का?
नियमांनुसार राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी पक्षांना एकूण मतांपैकी सहा टक्के मतांची आवश्यकता असते. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहा टक्के मते मिळालेले नाहीत, अशी चर्चा आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे विजयी उमेदवारांची संख्या कमी झाली होती. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून ही मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय हे पक्ष सत्ताधारी भाजपच्या विरोधातील पक्ष आहेत. त्यांचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. पण आम आदमी पक्षदेखील भाजपच्या विरोधातील पक्ष आहे. आम आदमी पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. तृणमूल काँग्रेसची दिल्लीत सत्ता आहे. आम आदमीने पंजाबच्या विधानसभा निवडणुकीतही करिश्मा दाखवत सत्ता मिळवली. त्यानंतर दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीतही आम आदमी पक्षाला सर्वाधिक जागांवर यश आलं. त्यानंतर या पक्षाने गुजरात विधानसभा निवडणूकही लढवली होती. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या मतांमध्ये वाढ झाली.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसला 2019च्या निवडणुकीत कमी जागांवर यश आलं. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे. हे पक्ष आगामी 2024 निवडणुकीत पुन्हा करिश्मा दाखवून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.