सोनिया गांधी यांची उद्या डिनर डिप्लोमसी, लोकसभेच्या जागा वाटपावरही चर्चा; संजय राऊत यांची माहिती
मणिपूरमध्ये भाजपची सत्ता नसती तर एव्हाना तिथे राष्ट्रपती राजवट लावली असती. सरकार खतम केलं असतं. पण पंतप्रधानाने अजून त्यावर भाष्य केलं नाही. मणिपूरच्या हिंसेवर युरोपियन पार्लमेंटमध्ये चर्चा होते. विश्वाला चिंता आहे. पण विश्वगुरुला चिंता नाही.
मुंबई, दिनांक 16 जुलै 2023 : बिहारच्या पाटण्यानंतर आता विरोधकांची बंगळुरू येथे बैठक होणार आहे. मागच्यावेळी विरोधकांच्या बैठकीला 18 पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी 23 पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. मागच्यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकाराने ही बैठक बोलावण्यात आली होती. तर यावेळी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी सर्वांना बैठकीचं आवतन दिलं आहे. यावेळी दोन दिवस ही बैठक चालणार आहे. बैठकीच्या पहिल्या दिवशी सोनिया गांधी यांच्याकडून विरोधकांना डिनर दिलं जाणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपांसह अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे, त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या बैठकीची माहिती दिली. उद्या 17 जुलै रोजी सर्व विरोधकांची बंगळुरूमध्ये बैठक होत आहे. सोनिया गांधी यांनी 17 जुलै रोजी विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी रात्रभोजनची व्यवस्था केली आहे. 18 तारखेलाही बैठक होणार आहे. यावेळी महत्त्वाच्या चर्चा होणार आहेत. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मी उपस्थित राहणार आहे. मला वाटतं एनसीपीचे प्रमुख शरद पवारही या बैठकीला जातील. काँग्रेसने या बैठकीचं आयोजन केलं आहे. महत्त्वाची बैठक आहे. सीट शेअरिंगवर चर्चा होईल. काही रुसवे फुगवे असतील तर ते दूर केले जातील, असं संजय राऊत म्हणाले.
ही काही स्पर्धा नाही
सत्ताधारी भाजपनेही बैठक बोलावली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही काही स्पर्धा नाही. आम्ही आमचं काम करत आहोत. पाटण्यानंतर बंगळुरूला बैठक होत आहे. त्यावेळी 18 पक्ष उपस्थित होते. आता 22 ते 23 पक्ष एकत्र येणार आहेत. या बैठकीत 2024च्या निवडणुकीबाबत भूमिका मांडली जाणार आहे, असं राऊत म्हणाले.
तर राष्ट्रपती राजवट लावली असती
यावेळी मणिपूरच्या हिंसेवरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला. राहुल गांधी फ्रस्टेड झाल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. राहुल गांधी फ्रस्टेड नेते कसे असू शकतात? मणिपूर देशाचाहिस्सा आहे. तिथे हिंसाचार सुरू आहे. हा हिंसाचार थांबवण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे. मणिपूरमध्ये भाजपची सत्ता नसती तर एव्हाना भाजपची भाषा बदललेली असती. तिथे राष्ट्रपती राजवट लावली असती. सरकार खतम केलं असतं. पण पंतप्रधानाने अजून त्यावर भाष्य केलं नाही. मणिपूरच्या हिंसेवर युरोपियन पार्लमेंटमध्ये चर्चा होते. विश्वाला चिंता आहे. पण विश्वगुरुला चिंता नाही, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
नैराश्य आहे, पण…
राहुल गांधी देशभर फिरले आहेत. आपल्याच देशात हिंसाचार होत असेल आणि आपल्या देशातील एक नेता त्यावर बोलत असेल तर त्यात नैराश्य कुठून आलं? नैराश्य आहे. पण सरकार काहीच बोलत नाही, त्याचं नैराश्य आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.