Gulabrao Patil : शिंदे यांच्या बंडानंतर आम्हाला म्हणाले तुम्हालाही जायचं असेल तर जा; गुलाबराव पाटलांचा राऊतांवर नाव न घेता आरोप
Gulabrao Patil : बाळासाहेब महापुरुष आहेत. याच सभागृहांने मान्यता दिली आहे. त्यामुळे बाळासाहेब आमच्या हृदयात होते आणि राहिल.
मुंबई: आम्ही बंड केलं नाही. आम्ही उठाव केला आहे. आम्ही बंड बिलकूल केलं नाही. हिंदुत्वाच्या विचाराशी फारकत होऊ नये म्हणून आम्ही हे केलं. तुमची माणसं तुमच्यापासून दूर गेली नाहीत. त्यांना दूर लोटलं गेलंय. आमचं समजून घ्या. ऐकून तर घ्या. ते काय म्हणताहेत ते. पण आमचं ऐकलं नाही. उलट आम्ही एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर 20 आमदार उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो. शिंदे काय म्हणत आहेत त्यांचं ऐकून घ्या, असं त्यांना सांगितलं. समजून घ्या अशी विनंती केली. तोपर्यंत आम्ही शिंदे साहेबांकडे गेलो नव्हतो. पण तिथल्या एका नेत्याने, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, असं आम्हाला सांगितलं, अशा शब्दात शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचं (sanjay raut) नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदनाचा ठराव विधानसभेत मांडण्यात आला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी ही खदखद व्यक्त केली.
आम्हाला तोडण्याचा प्रयत्न केला. कुणी म्हटलं नाही या बाळांनो बसा. काय म्हणणं आहे सांगा. शिंदे साहेब गेले. त्यानंतर आम्ही 20 आमदार गेलो. असं असं शिंदे साहेब म्हणत आहेत. त्यांचं ऐकून घ्या, असं नेतृत्वाला सांगितलं. त्यावर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हीही जा… असं एका नेत्याने सांगितलं. असं होत नाही. हे आमच्या निष्ठेचं फळ?, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला.
हे काही आजच झालं का?
बाळासाहेब महापुरुष आहेत. याच सभागृहांने मान्यता दिली आहे. त्यामुळे बाळासाहेब आमच्या हृदयात होते आणि राहिल. युती कायम राहावी म्हणून आम्ही भरपूर प्रयत्न केले. शिंदे साहेब पाच वेळा गेले. केसरकर, शंभुराजे साक्षी आहेत. हे काही आजच झालं का? वात लागली आणि बॉम्ब फुटतो. अजितदादांचा हेवा वाटायचा, असा नेता असावा. 6 वाजले की टेबलावर. कार्यकर्त्यांचं ऐकणार. पक्ष पाहणार. आमचीही ती भावना होती. भेट मिळावी, आमचंही म्हणणं कुणी ऐकावं. काय लागतं कार्यकर्त्याला. एक मंत्री तर भेट देत नाही. पण फोटोही काढत नाही. जणू काही मी त्या देशाचा नाही असा हा मंत्री वागतो, असं पाटील म्हणाले.
ही काही आजची आग नाही
गुलाबराव तुला टपरीवर पाठवील, अशी भाषा केली जात होती. अरे, धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे हा इतिहास आहे. मुख्यमंत्रीही रिक्षा चालवायचे हा इतिहास आहे. ज्याला काही काम नव्हतं अशा नेतृत्वाला बाळासाहेबांनी निवडून आणलं. आमच्या प्रारब्धात बाळासाहेबांनी लिहिलं एक दिवस तुम्ही आमदार व्हाल. आम्ही शिवसेना सोडली नाही. त्यामुळे आमच्या निवडून येण्याची चिंता, काळजी करू नका. आमच्या पेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात. 55 आमदारावरून 40 आमदार कसे काय फुटताहेत? 40 आमदार जेव्हा फुटतात ही काही आजची आग नाही. आमचं घर सोडून येण्याची इच्छा नाही. बाळासाहेबांना दु:ख देण्याची इच्छा नाही. त्यांच्या मुलाला दु:ख देण्याची इच्छा नाही, असंही ते म्हणाले.
धमक्या आम्हाला देता येतात
कोरोना आला. तेव्हा शिंदेंनी प्रत्येकाला बोलावलं. रेमडेसिवीर हवीय का?. धान्य वाटायला हवंय का? किट्स हवीय का? अशी विचारणा ते करायचे. इकडे भेट होत होती. पण ते भेट देत नव्हते. मंत्री म्हणून आम्हाला भेट देत होते. आमच्यावर टीका केली. आम्हाला धमक्या दिल्या. अरे धमकी देण्याचा धंदा आमचाही आहे. आम्ही चार लाख लोकांतून आलो आहे. मनगटात जोर आहे. म्हणून इथपर्यंत आलोय, असा इशाराही त्यांनी दिला.