पिताजी आशीर्वाद बना रहे… तुरुंगातून सुटलेल्या राम रहिमच्या ऑनलाईन सत्संगात भाजप नेत्यांची रांग
बाबजीचा सत्संग होता. त्यांनी सत्संगाचं निमंत्रण दिलं होतं. उत्तर प्रदेशातून ऑनलाइन सत्संग होता. माझ्या वॉर्डातील अनेक लोकांनी या सत्संगाला ऑनलाईन हजेरी लावली.
करनाल: बलात्काराचा आरोपी गुरमीत राम रहीम (gurmeet ram rahim) पॅरोलवर सुटला आहे. पॅरोलवरून (parole) सुटताच 18 ऑक्टोबर रोजी राम रहीमने उत्तर प्रदेशातील (uttar pradesh) बागपत येथे एक व्हर्च्युअल सत्संग आयोजित केला होता. या कार्यक्रमाला हरियाणातील भाजपचे बडे नेते उपस्थित होते. राम रहीमच्या या ऑनलाईन कार्यक्रमाला पंचायत निवडणुकीच्या उमेदवारांनीही हजेरी लावली आणि त्याचे आशीर्वाद घेतले. भाजपच्या महापौरांनी तर पिताजी, आपका आशीर्वाद बना रहे, असं म्हणत त्याचे दर्शन घेतले.
भाजपच्या करनाल येथील महापौर रेणू बाला गुप्ता या सुद्धा राम रहीमच्या ऑनलाईन सत्संगात सहभागी झाल्या होत्या. महापौर रेणू यांनी राम रहीम यांचा उल्लेख पिताजी असा केला. त्यानंतर त्यांनी राम रहीम यांच्याशी फोनवरून संवाद साधला. पिताजी, तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या. तुम्ही यापूर्वीही करनालला आले होते. त्यावेळी तुम्ही स्वच्छतेचा संदेश दिला होता. तुमच्या या संदेशानंतर आम्ही स्वच्छता मोहीम राबवून आगेकूच करत आहोत. तुम्ही पुन्हा येऊन करनालला पुढे जाण्यासाठी मदत करा. तसेच सर्वांना आशीर्वाद द्या, असं महापौर रेणू बाला गुप्ता म्हणाल्या.
त्यावर राम रहीमनेही त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. तुम्हा सर्वांना भरपूर आशीर्वाद. तुम्ही सर्व जबाबदार आणि महत्त्वाची माणसं आहात. देशाला असंच पुढे न्या. देशाचा लौकीक वाढवा, असं राम रहीम म्हणाला. यावेळी रेणू बाला गुप्ता यांच्यासह भाजपचे जिल्हा अध्यक्ष योगेंद्र राणा, उपमहापौर नवीन कुमार आणि राजेश कुमार आदी उपस्थित होते.
हरियाणात पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. त्याचवेळी राम रहीम पॅरोलवर सुटला आहे. करनाल हा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा मतदारसंघही आहे. दरम्यान, गुरमीत राम रहीम पॅरोलवर सुटणे ही एक रुटीन प्रक्रिया असल्याचं हरियाणा सरकारने म्हटलं आहे. येत्या 3 नोव्हेंबर रोजी हरियाणाच्या आदमपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. हा विभाग हिसार जिल्ह्यात येत आहे. या भागात राम रहीमचा चांगला प्रभआव आहे.
दरम्यान, बाबजीचा सत्संग होता. त्यांनी सत्संगाचं निमंत्रण दिलं होतं. उत्तर प्रदेशातून ऑनलाइन सत्संग होता. माझ्या वॉर्डातील अनेक लोकांनी या सत्संगाला ऑनलाईन हजेरी लावली. या सत्संगाशी भाजपचा आणि निवडणुकीचा काहीच संबंध नाही, असं भाजप नेते राजेश कुमार यांनी सांगितलं.
कोणताही व्यक्ती पॅरोलची मागणी करू शकतो. कैद्यांना पॅरोलचा अधिकार आहे. राम रहीमने दिवाळीमुळे पॅरोल घेतला असेल. त्यामुळे त्यांच्या पॅरोलचं निवडणुकीशी कनेक्शन जोडू नये, असं उपमहापौर नवीन कुमार यांनी सांगितलं.