Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदासाठी पवारांचा नकार, आता विरोधकांकडून ‘ही’ तीन नावे चर्चेत; मोदींना मान्य होणार?
Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण काल राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत पवार यांनी आपण या पदाच्या स्पर्धेत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नाही.
नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election) विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू आहे. उद्या विरोधकांची दिल्लीत या संदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण पवारांनीच आपण या स्पर्धेत नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्याच्या बैठकीत या नावांवर चर्चा होणार आहे. मात्र, सध्या राष्ट्रपतीपदासाठी तीन नावे चर्चेत आहेत. त्यात एका माजी पंतप्रधानाचं नाव आहे. तर दोन माजी मुख्यमंत्र्यांची नावेही या पदासाठी चर्चेत आहेत. त्यावर उद्याच्या विरोधकांच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. मात्र, काँग्रेस (congress) कुणाचं नाव पुढे करते याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सुद्धा काही नावे पुढे करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विरोधकांच्या उद्याच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण काल राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत पवार यांनी आपण या पदाच्या स्पर्धेत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांचा उमेदवार असणार नाही, असं पवारांनी सांगितलं. विशेष म्हणजे या आधाची महाराष्ट्र काँग्रेसने राष्ट्रपतीपदासाठी पवारांच्या नावाचं समर्थन केलं होतं. रविवारी आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनीही पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर सिंह यांनी पवार जर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असं म्हटलं होतं.
तीन नावे चर्चेत
मीडिया रिपोर्टनुसार, पवारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उभं राहण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि माजी पंतप्रधान एचडी देवैगोडा यांच्या नावाची राष्ट्रपतीपदासाठी चर्चा सुरू झाली आहे. या नावांवर उद्याच्या विरोधकांच्या बैठकीत चर्चा होणार आहे. मात्र, कोणत्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे उद्याच समजू शकणार नाही. ऐनवेळेला आणखी काही नावांचा विचारही विरोधकांच्या बैठकीत होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
बैठक का?
ममता बॅनर्जी यांनी स्वत: पुढाकार घेऊन उद्या दिल्लीत विरोधकांच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांच्या प्रमुखांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. भाजपच्या विरोधात मजबूत आणि तगडा उमेदवार देण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही बैठक बोलावण्यात आली आहे.
दोन नावे मोदींना मान्य होणार?
दरम्यान, सध्या राष्ट्रपतीपदासाठी तीन नावे चर्चेत आहेत. फारूख अब्दुल्ला, गुलाम नबी आझाद आणि एचडी देवैगोडा ही ती तीन नावे आहेत. यापैकी गुलाम नबी आझाद आणि देवैगोडा यांच्याशी मोदींचे वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे या दोन्ही नावांपैकी एक नाव पुढे आल्यास त्याला मोदी पसंती दर्शवतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.