‘हैदराबाद संस्थानात’ भगवी लाट; पालिका निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी; 49 जागांवर दणदणीत विजय
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या हैदराबाद पालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. (Hyderabad GHMC Election Results 2020 live updates: TRS wins 56 seats, BJP 49, AIMIM 43)
हैदराबाद: एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या हैदराबाद पालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. ग्रेटर हैदराबाद पालिका निवडणुकीत भाजपने 150 पैकी 49 जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली आहे. पालिका निवडणुकीत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून ओवेसींचा एमआयएम तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये एन्ट्री करून इतर राजकीय पक्षांची गणितं बिघडवणाऱ्या ओवेसींना भाजपने त्यांच्याच घरात मात दिल्याने एमआयएमच्या तंबूत खळबळ उडाली आहे. (Hyderabad GHMC Election Results 2020 live updates: TRS wins 56 seats, BJP 49, AIMIM 43)
ग्रेटर हैदराबाद पालिका निवडणुकीच्या सर्वच्या सर्व 150 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत टीआरएसने 56 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने 49 आणि एमआयएमने 43 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला केवळ दोनच जागांवर विजय मिळविता आला असून टीडीपीचा मात्र सुपडा साफ झाला आहे.
एमआयएमला एका जागेचं नुकसान
2016च्या पालिका निवडणुकीत टीआरएसने 99 जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यांना केवळ 56 जागा मिळाल्याने त्यांचं 43 जागांचं नुकसान झालं आहे. तर एमआयएमला 44 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना एका जागेचं नुकसान झालं आहे. काँग्रेसला गेल्या निवडणुकीत अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या. त्यांना हे संख्याबळ राखण्यात यश आलं आहे. परंतु गेल्या निवडणुकीत अवघ्या चार जागा जिंकणाऱ्या भाजपने थेट 49 जागा जिंकल्या आहेत. म्हणजे भाजपने तब्बल 45 जागा अधिकच्या जिंकून हैदराबादमधील राजकीय समीकरणंच मोडीत काढले आहेत. भाजपने टीआरएसच्या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक विजय मिळवून टीआरएसच्या बालेकिल्ल्यांनाही सुरुंग लावला आहे.
ओवेसींसाठी मोठा धक्का
ओवेसींच्या एमआयएमने गेल्या दहा वर्षांपासून संपूर्ण देशभर दबदबा निर्माण केला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ओवेसींनी काँग्रेस-राष्ट्रवादीचं, उत्तर प्रदेशाता बसपा नेत्या मायावती आणि सपा नेते अखिलेश यादव यांचं राजकीय गणित बिघडवलं आहे. तर, नुकत्याच झालेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत ओवेसींनी काँग्रेस आणि राजदचं राजकीय गणित बिघडवून त्यांना सत्तेपासून दूर ठेवलं आहे. त्यामुळे हैदराबाद या आपल्या बालेकिल्ल्यात ओवेसी दमदार कामगिरी करून सत्ता काबिज करतील असं बोललं जात होतं. पण प्रत्यक्षात भाजपने ओवेसींच्या घरात जाऊन जोरदार बॅटिंग करून दुसऱ्या क्रमांकावर मुसंडी मारली आहे. गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एमआयएमला भाजपने तिसऱ्या क्रमांकावर फेकले आहे. हैदराबाद पालिकेत तेलंगनाची सत्ता होती. त्यांना या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. मात्र, राजकीय अर्थाने या निवडणुकीत ओवेसींचं संस्थान खालसा झाल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे.
तेलंगनाच्या मतदारांचा मोदींवर विश्वास
भाजप नेते अमित शहा यांनी ट्विट करून तेलंगनाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याचं म्हटलं आहे. तेलंगनाच्या जनतेने मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. या निवडणुकीत भाजपने सर्वस्व झोकून काम केलं होतं, असं शहा यांनी म्हटलं आहे. (Hyderabad GHMC Election Results 2020 live updates: TRS wins 56 seats, BJP 49, AIMIM 43)
Gratitude to the people of Telangana for reposing faith in PM @NarendraModi led BJP’s Politics of Development.
Congratulations to Shri @JPNadda ji and Shri @bandisanjay_bjp for BJP’s astounding performance in GHMC.
I applaud the hard work of our karyakartas of @BJP4Telangana.
— Amit Shah (@AmitShah) December 4, 2020
दक्षिणेवरील स्वारीचा मार्ग मोकळा होणार?
दक्षिण भारतात हातपाय रोवणे भाजपसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. अगदी मोदी लाटेतही त्यांना दक्षिणेवर स्वारी करता आलेली नाही. कर्नाटक वगळता आंध्र प्रदेश, तेलंगना, तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजपचा म्हणावा तसा प्रभाव नाही. दक्षिणेकडील या राज्यात भाजपला आपल्या बळावर काहीच करता आलेले नाही. त्यामुळे त्यांना आघाडीचं राजकारण करून काही जागा निवडून आणावं लागतं. मात्र हैदराबाद महापालिका निवडणुकीत विजय मिळवून दक्षिणेवरील स्वारी करण्याची व्यूहरचना भाजपला करायची आहे. त्यानुसार भाजपकडून गणितं मांडली जात आहेत. हैदराबादमध्ये होणाऱ्या विजयाच्या अनुषंगाने भाजप नेते अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रणनीती तयार केल्याचंही सूत्रांनी सांगितलं. (Hyderabad GHMC Election Results 2020 live updates: TRS wins 56 seats, BJP 49, AIMIM 43)
आता मोर्चा तेलंगनाकडे
या पालिका निवडणुकीत भाजपने जोरदार प्रचार केला होता. हैदराबादमध्ये जम बसवण्यासाठी भाजपने बड्या नेत्यांची फौज उतरवून आक्रमक प्रचार केला होता. गेल्यावेळी केवळ चार जागा जिंकणाऱ्या भाजपने 49 जागा जिंकून भाजपने मोठं यश मिळवल्याचं राजकीय निरीक्षक सांगत आहेत. हैदराबादमध्ये विधानसभेच्या 24 आणि लोकसभेच्या 5 जागा येतात. येथील लोकसंख्या 82 लाखापेक्षा अधिक आहे. मुस्लिमांच्या तुलनेत हिंदुंची लोकसंख्याही या भागात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे भाजपने हैदराबाद आणि पर्यायाने तेलंगना मिळवण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. पालिका निवडणूक ही त्यांच्यासाठी लिटमस टेस्ट आहे. या निवडणुकीत 49 जागा मिळविल्याने आता त्या बळावर संपूर्ण हैदराबादभर हातपाय पसरण्यासाठी भाजपला वाव मिळणार आहे. हैदराबादेतील यशानंतर भाजपला तेलंगानाच्या दिशेनेही मोर्चा वळवायचा आहे. तेलंगनामध्ये विधानसभेच्या 119 जागा असून तेलंगनात भाजपचे केवळ दोनच आमदार आहेत. दुसरीकडे तेलंगनात लोकसभेच्या 17 जागा असून भाजपचे चार खासदार आहेत. त्यामुळे हैदराबाद जिंकतानाच तेलंगनातही पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचं मानलं जात आहे. (Hyderabad GHMC Election Results 2020 live updates: TRS wins 56 seats, BJP 49, AIMIM 43)
संबंधित बातम्या:
हैदराबाद पालिका निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर; तरीही भाजपचा दक्षिणेवरील स्वारीचा मार्ग मोकळा?
(Hyderabad GHMC Election Results 2020 live updates: TRS wins 56 seats, BJP 49, AIMIM 43)