मी ब्राह्मण म्हणून सॉफ्ट टार्गेट; देवेंद्र फडणवीस यांचं धक्कादायक विधान
सरकार स्थिर होतंच. पण राजकारणात शक्ती वाढवावीच लागते. तुमची शक्ती वाढवण्यासाठी कोणी येत असेल तर का घेऊ नये? राष्ट्रवादी आमच्याकडे 2019ला येणार होती. स्थिर सरकार आणि चांगलं सरकार हे उद्धव ठाकरेंच्या सोबत येऊ शकत नाही हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांना आमच्यासोबत यायचं होतं. प्रस्ताव किंवा कागद घेऊन कोणी येत नसतं. राजकारणात सीरिज ऑफ चर्चा असते. त्यातून प्रस्ताव तयार होतो.
मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : राज्यात कोणत्याही घडामोडी घडल्यावर विरोधकांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केलं जातं. फडणवीस यांच्यावरच टीका केली जाते. फडणवीस यांना का टार्गेट केलं जातं? यावर खुद्द त्यांनीच भाष्य केलं आहे. मराठा समाजाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना लोकांनी तुम्ही काय केलं असं विचारायला सुरुवात केली. त्यामुळे या नेत्यांनी मला बदनाम करण्याचं काम केलं. त्यांना माझी जात माहीत आहे. मी ब्राह्मण आहे. माझी जात बदलण्याचं कारणही नाही. त्यामुळे हा सॉफ्ट टार्गेट आहे वाटतं. मला टार्गेट केलं जातंय, असं धक्कादायक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही9 मराठीला खास मुलाखत दिली. टीव्ही9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांना चांगलंच फटकारलं. हे मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत. हा गेल्या 37 वर्षापासूनचा त्यांचा नाकर्तेपणा आहे. त्यामुळे ते आक्रमकतेने मला टार्गेट करण्यासाठी एकत्र येत असतात. लोक हे बघत आहेत. त्यांनी कितीही टार्गेट केलं तरी सामान्य मराठ्यांना माहीत आहे. माझ्यासाठी जात डिसअॅडव्हान्टेज ठरलीय असं मानत नाही. मी जातीचं कार्ड कधीच प्ले करत नाही. सामान्य माणसाच्या मनात जात नसते. कर्तृत्व असतं. त्यांना काही काळासाठी संभ्रमित करू शकता. काही काळासाठी मला टार्गेट करू शकता. सदा सर्वदा करू शकत नाही. शेवटी तुम्ही काय केलं हा प्रश्नच येत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
म्हणून मी टार्गेट
मला टार्गेट करण्याचं एकच कारण आहे. ते म्हणजे माझ्याकाळात मराठा समाजाला आरक्षण मिळणं. मराठा आरक्षणाची लढाई 1980 साली सुरू झाली. 1982ला अण्णासाहेब पाटलांनी आरक्षणासाठी जीव दिला. तेव्हापासून ही लढाई सुरू आहे. पहिल्यांदा आरक्षण मी दिलं. कोर्टात टिकवलं. मी म्हटलं आरक्षण महत्त्वाचं आहे. पण आरक्षणाने समस्या सुटणार नाही. वर्षाला 30 हजार नोकऱ्या निघतात. मराठा समाजाचं 10 टक्के आरक्षण पकडलं तर 3 हजार नोकऱ्या त्यांना मिळतील. त्याने आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का?, असा सवाल फडणवीस यांनी केला.
नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे, पण…
ज्या नोकऱ्या वर्षाला निघणार आहे, त्या मिळाल्याच पाहिजे. त्यामुळे अण्णासाहेब आर्थिक महाविकास महामंडळ आम्ही सक्षम केलं. त्यातून 50 हजार कोटींचं कर्ज दिलं. 70 हजार उद्योजक उभे राहिले. त्यांनी दोन लोकांना रोजगार दिला असेल तर 2 लाख तरुणांना रोजगार मिळाला असेल. मी सारथी संस्था बळकट केली. खासगी इंजिनीयर आणि मेडिकल कॉलेजात मराठा समाजाच्या मुलांना 50 टक्के सीट देण्याचा प्रयत्न केला. हॉस्टेलची सुविधा दिली. त्यामुळे सर्व सामान्य लोक तुम्ही 37 वर्षात काय केलं असं त्यांना विचारत आहे. म्हणूनच मला विरोधक टार्गेट करत आहेत, असं ते म्हणाले.
दादा करेक्ट बोलले
यावेळी देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार यांचा एक बाईटही दाखवण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस दिल्लीला गेले होते. त्याबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं. तेव्हा मला विचारून गेले का? असा सवाल अजितदादांनी केला. त्यामुळे अजितदादांना विश्वासात घेतलं जात नसल्याची चर्चा रंगली. त्यानुषंगाने फडणवीस यांना खरंच अजितदादांना विश्वासात घेतलं जात नाहीये का? असा सवाल करण्यात आला. त्यावरही फडणवीस यांनी बिनदिक्कतपणे प्रतिक्रिया व्यक्त केली.
अजितदादा काय चूक बोलले? पहिली गोष्ट तर हा अर्थ मीडियाने काढला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कुठे गेले हे मला माहीत नाही हे अजिदादांनी सांगितलं. ते बरोबरच आहे. मी आणि सीएम गेलो होतो. दादाशी संबंधित विषय असता तर ते आमच्यासोबत आले असते. समजा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची एक केस सुरू आहे. राष्ट्रवादीची एक सुरू आहे. शिवसेनेच्या केस बाबत आम्हाला वकिलांशी काही चर्चा करायची असेल तर त्या संदर्भात काही निर्णय करायचे असेल, काही डावपेच ठरवायचे असतील तर त्यात अजितदादा येणार नाही. त्यांचे कामही असणार नाही.
उद्या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या केसच्या संदर्भात काही चर्चा करायची असेल तर त्याला मुख्यमंत्री येणार नाही. त्याला अजितदादा असतील. त्यावरून मला असं वाटतं की, अजितदादा बोलले ते अगदी करेक्ट आहे. मीही अजितदादांच्या जागी असतो तर, ते गेले बाबा मला माहीत नाही, असं म्हणालो असतो, असं उत्तर त्यांनी दिलं.
दादा आमच्यासोबत कंफर्टेबल
मीडिया नेत्यांना जाता जाताही काही प्रश्न विचारतात. तुमचा माईक चालू आहे की नाही हे आम्हाला माहीत नसतं. त्यावेळी आम्ही काही बोललो तर तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढता. आता दिवसभरात दादा काय करतात मला माहीत नाही. मी काय करतो हे दादांना माहीत नसतं. मुख्यमंत्री दिवसभर काय करतात ते आम्हाला सांगून करत नाही. जिथे तिघांना एकत्र येण्याची गरज असेल तर एकत्र येतो. दादा आमच्यासोबत शंभर टक्के कंफर्टेबल आहेत. तुम्ही त्यांनाही विचारा, असंही ते म्हणाले.