Uddhav Thackeray : शिवसेना ‘मातोश्री’पर्यंत मर्यादित राहणार?; आधी पक्षातील फूट आणि आता राऊतांच्या अटकेचे संकेत काय?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्यासोबत फक्त मुंबईतील नेतेच राहिले आहेत. अनिल परब, अनिल देसाई, संजय राऊत, सुभाष देसाई, वरुण देसाई, सुनील प्रभू, अजय चौधरी आणि रवींद्र वायकर आदी मुंबईतील नेतेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. यातील अनेक नेते मास लीडर नाहीत.
मुंबई: शिवसेनेचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांना ईडीने (ED) अटक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. पक्षाची मुलुख मैदानी तोफ असलेल्या राऊत यांना अटक झाल्याने शिवसेनाही हादरून गेली आहे. आधीच 40 आमदारांनी केलेलं बंड, त्यानंतर 12 खासदारांनी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचं नेतृत्व नाकारत केलेलं बंड यामुळे शिवसेनेला जोरदार हादरे बसले आहेत. एकीकडे पत्त्यासारखा कोसळणारा पक्ष जनमाणसात मजबूत करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केलेलं असतानाच दुसरीकडे पक्षामागचं लागलेलं ग्रहण सुटताना दिसत नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरे हे केवळ मातोश्रीपर्यंतच मर्यादित राहणार आहे की उद्धव ठाकरे पुन्हा एकदा कम बॅक करत विरोधकांना प्रत्युत्तर देणार? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
लढाऊ चेहरा अटकेत
संजय राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते आहेत. मात्र, पत्राचाळ प्रकरणात ईडीने राऊत यांना रविवारी रात्री उशिरा अटक केली. काल सकाळी ईडीचं एक पथक राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी आली होती. ईडीने तब्बल नऊ तास राऊत यांच्या घरात झाडाझडती केली. त्यानंतर राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. दिवसभरातील एकूण 16 तासांच्या चौकशी नंतर राऊत यांना अटक करण्यात आले. मेडिकल चेकअप नंतर आज दुपारी त्यांना लंच नंतर पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येणार आहे. राऊत यांची अटक करून उद्धव ठाकरे यांना शह देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे सध्या संकटाच्या फेऱ्यात आहेत. त्यातच राऊत यांना अटक केल्याने ठाकरेंवरील संकट अधिकच वाढलं आहे.
राऊत हे शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ आहेत. तसेच शिवसेनेचा चेहरा आहे. राऊत हे महाविकास आघाडीचे शिल्पकारही आहेत. राज्य आणि केंद्रातील राजकारणात राऊत यांचा दबदबा आहे. आता राऊत यांनाच अटक झाल्याने केंद्रीय पातळीवरील शिवेसनेकडे चेहरा राहिलेला नाही. राऊत यांना अटक झाल्याने आता शिंदे गटाचं वर्चस्व वाढणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकणात फटका
शिवसेनेत मोठी बंडाळी झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यामुळे विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला ठाणे जिल्हाही उद्धव ठाकरे यांच्या हातातून निसटला आहे. शिंदे यांचं वर्चस्व या जिल्ह्यावर असल्याने या जिल्ह्यातील झाडून सर्व नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत.
खासदारही सोबत नाहीत
डझनभर खासदारांनी ही उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. लोकसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या या खासदारांना मान्यताही दिली आहे. राहुल शेवाळे. संजय मंडलिक, कृपाल तुमाने, हेमंत पाटील, भावना गवळी आणि सदाशिव लोखंडेंसारखे बडे नेतेही शिंदे गटात सामील झाल्याने राज्यातील ग्रामीण भागातील शिवसेनेचं संघटनच धोक्यात आलं आहे.
फक्त मुंबईतील नेते सोबत
उद्धव ठाकरे यांच्यासोबत फक्त मुंबईतील नेतेच राहिले आहेत. अनिल परब, अनिल देसाई, संजय राऊत, सुभाष देसाई, वरुण देसाई, सुनील प्रभू, अजय चौधरी आणि रवींद्र वायकर आदी मुंबईतील नेतेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. यातील अनेक नेते मास लीडर नाहीत. शिवसेनेच्या 14 माजी मंत्र्यांपैकी 9 जण सोडून गेले आहेत. तसेच तीन विधान परिषदेचे सदस्य उद्धव ठाकरेंसोबत आहेत. तर दुसरीकडे जनाधार असलेले नेते शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अत्यंत कमकुवत असल्याचं दिसून येत आहे.
बालेकिल्ल्यात शिंदेंचं वर्चस्व
राज्यात मुंबई वगळता ठाणे, कल्याण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात शिवसेनेचा जनाधार आहे. शिवसेनेचे हे बालेकिल्ले मानले जातात. शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात इतर पक्ष अस्तित्व निर्माण करण्यासाठी झगडत आहेत. मात्र, याच भागातील नेते आता शिंदे गटात आल्याने शिवसेनेची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.