शिवाजी पार्कवर शपथ घेऊन एक वर्ष पूर्ण, पुढची चार वर्षं कशी जातील ते भाजपला कळणार नाही : जयंत पाटील
"राज्य सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरं सुरु केली. त्यामुळे भाजपने आकाळतांडव करुन राजकारण करण्याची आवश्यकता नाही", अशी टीका जयंत पाटील यांनी केली (Jayant Patil slams BJP).
अहमदनगर : “शिवाजी पार्क येथे शपथ घेऊन आम्हाला एक वर्षे पूर्ण झालं. हे एक वर्ष कसं गेलं हे भाजपला कळलं नाही. तर उरलेली चार वर्षदेखील कशी जातील हे त्यांना कळणार नाही”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. जयंत पाटील आज (16 नोव्हेंबर) भाऊबीज निमित्त नगरला आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली (Jayant Patil slams BJP).
महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होऊन आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र, भाजपकडून वारंवार हे सरकार जास्त काळ टीकणार नाही, अंतर्गत मतभेदांमुळे हे सरकार पडेल, अशी टीका केली जात आहे. याबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
“भारतीय जनता पक्षाचे नेते कोरोनाच्या संकट काळात अत्यंत बेजबाबदारपणे वागले. त्यांचा बेजबाबदारपणा प्रत्येक गोष्टीत दिसून आला. कोरोना हे मोठं संकट आहे. मात्र, तरीही हा विषय बाजूला ठेवून त्यांनी आपल्या पक्षाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला”, असा घणाघात जयंत पाटील यांनी केला.
“मंदिरं बंद होती तर त्यांनी मंदिराबाहेर आंदोलन केली. खरंतर कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी मंदिरं बंद होती. मात्र, जाणीवपूर्वक आंदोलन करायची आणि आम्ही कसे भक्त आहोत ते दाखवायचं”, असा चिमटा पाटील यांनी काढला.
“प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींचे होते. मोदींनीच मंदिर काय सर्वच बंद करायला सांगितलं होतं. आता विनाकारण मंदिरं खुले करण्यासाठी आंदोलन करुन कोरोनासारख्या संकटाची दिशा बदलण्याचे काम भाजप करु पाहत आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.
“राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्याची तयारी केली पाहिजे. त्यामुळे आम्ही गर्दी टाळण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून करतोय”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली (Jayant Patil slams BJP).
“राज्य सरकारने विचारपूर्वक सर्व गोष्टी सुरु केल्या. आता दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर सुरु केली. त्यामुळे भाजपने आकाळतांडव करुन राजकारण करण्याची आवश्यकता नाही”, असा खोचक सल्ला जयंत पाटील यांनी दिला.
हेही वाचा :
ऑपरेशन कमळबाबत इतक्यात सांगता येणार नाही, पण पक्ष सांगेल ते आम्ही नक्की करु : प्रसाद लाड