‘भागवत कराड यांनी फार मोठा तीर मारला नाही’, जयंत पाटील कडाडले
भागवत कराड यांनी आरोप केल्यानंतर जयंत पाटील यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भागवत कराड यांचं पत्र आणि इतर कागदपत्रे दाखवत आपली भूमिका मांडली.
मुंबई : केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी जायकवाडी फ्लोटिंग सोलार प्रकल्पावरुन महाविकास आघाडीवर टीका केलीय. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात असताना भागवत कराड यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. मराठवाड्यातील प्रकल्प कुठेच गेले नाहीत. उलट मराठवाड्यातील जायकवाडी फ्लोटिंग प्रकल्पाला महाविकास आघाडीने परवानगी दिली नाही. याउलट सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करुन काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. पण हा प्रकल्प दोन वर्षांपूर्वीच सुरु होणे अपेक्षित होते, असा दावा त्यांनी केलाय. त्यांच्या या आरोपांना माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलं. “भागवत कराड यांनी फार मोठा तीर मारला नाही”, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
भागवत कराड यांनी आरोप केल्यानंतर जयंत पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भागवत कराड यांचं पत्र आणि इतर कागदपत्रे दाखवत आपली भूमिका मांडली. “त्यांनी असा आरोप केला की, महाराष्ट्र सरकारने आणि जयंत पाटलांनी फ्लोटींग सोलार पॅनल बसवून वीज निर्मितीचा प्रकल्प नाकारला. असा नाकार जयंत पाटलांनी त्यांना कुठे दिला असेल तर त्यांनी त्या नाकाराचा कागद द्यावा”, असं आव्हान जयंत पाटील यांनी दिलं.
“महाराष्ट्र सरकार प्रकल्प करत नसेल तर त्याची माहिती द्यावी. त्यांनी तरी महाराष्ट्र सरकारला एनटीपीच्यामार्फत काय प्रपोज दिलंय याचा काही डिटेलमध्ये प्रस्ताव आहे का? त्यांनी मला एक साधा फोन केला. मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला पत्र पाठवा. त्यांनी मग पत्र पाठवलं. दोन दिवसांत त्याच्यावर दोन महिन्यात समिती नेमून ताबडतोब निष्कर्ष काढावा, अशा सूचना दिल्या”, असं जयंत पाटील म्हणाले.
“कॅडच्या सचिवांना आदेश दिल्यावर त्यांनी समिती गठीत केली. समिती त्याच्यावर काम करते. समितीने दोन महिन्यात निष्कर्ष करावा, अशा सूचना माझ्या फाईलमध्ये आहेत. त्यामुळे त्याचं निष्कर्ष निघाल्यानंतर जे काही सरकार असेल ते त्यावर काम करेल”, असं देखील जयंत पाटील म्हणाले.
‘भागवत कराड अस्वस्थ झालेत’
“भागवत कराडांनी भाजपने औरंगाबादमध्ये लोकसभेला उभं राहायला सांगितलं आहे. त्यामुळे ते अस्वस्थ झालेले आहेत. त्यांना सांगितलंय की, पुढच्यावेळी राज्यसभा नाही तर लोकसभा लढवायची आहे. लोकसभेत औरंगाबादमधील जनतेला इम्प्रेस करण्यासाठी हे सगळे उद्योह चालले आहेत. बाकी माझ्या दृष्टीने त्यांना जास्त महत्त्व नाही”, अशी टीका त्यांनी केला.
“भागवत कराड माहिती घेऊन बोलले असते तरे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून त्यांच्याबद्दलचा आदर वाढला असता”, असादेखील टोला त्यांनी यावेळी लगावला.
भागवत कराड यांच्या ‘नाचता येईना अंगण वाकडे’ या टीकेवर जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. “त्यांना नाचता येईना की आम्हाला? आम्हाला नाचायचा प्रश्नच नाहीय. आम्ही कधी नाच करत नाहीत. आम्ही जे काही करायचं ते करेक्ट करतो”, असं प्रत्युत्तर जयंत पाटलांनी दिलं.
“त्यांना आता काही जमेत नसेल म्हणून लोकांना प्रभावित करण्यासाठी ते असा प्रकार करत असतील. त्यांनी सांगावं की जयंत पाटलांनी त्यांना कधी नकार दिला? आमच्याकडून नकारात्मक प्रकल्प कधी गेलं? प्रकल्प कुणीच थांबवलेला नाहीय. त्यांनी फार मोठा तीर मारलाय असंही नाहीय. त्यांनी काही प्रकल्प आणलेला नाही. त्यांनी फक्त कल्पना दिली की पाण्यावर फ्लोटींग सोलार पॅनल बसवू. पण त्याची चर्चा आम्ही यापुढेच करतोय. त्यामुळे नवीन काही रॉकेट सायन्स यामध्ये नाहीय”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.