त्यांची आणि आमची जुनी ओळख; अजित पवार यांच्याकडे पाहत जयंतरावांचा चिमटा
मुख्यमंत्र्यांनी नाव घेताच अजित पवार यांनी उभं राहून हात जोडत सर्वांना अभिवादन केलं. त्यानंतर अजित पवार खाली बसत असतानाच समोर बसलेल्या जयंत पाटील यांनी अजित पवार यांना चिमटा काढला.
मुंबई | 17 जुलै 2023 : राज्याचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. राष्ट्रवादीत पडलेली फूट आणि राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन होत असल्याने या अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या अधिवेशनात राष्ट्रवादीचा एक गट दुसऱ्या गटाला कसा रिस्पॉन्स देतो, त्यांच्यात टोलेबाजी रंगतेय का? याकडे सर्वांचं लक्ष होतं. टोलेबाजी करण्यात तरबेज असलेले राष्ट्रवादीत अनेक नेते आहेत. जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेते कोट्या करण्यात एक्स्पर्ट आहेत. त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
अखेर तो क्षण आला…
सकाळी बरोबर सव्वा दहा वाजता सभागृहाचं कामकाज सुरू झालं. प्रथा आणि पंरपरेनुसार नव्या मंत्र्यांची सभागृहाला ओळख करून द्यायची असते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नव्या मंत्र्यांचा परिचय करून देत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पहिलीच ओळख अजित पवार यांची करून देण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री आणि वित्त असा उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्याकडे पाहिलं. ही संधी हेरून देवेंद्र फडणवीस यांनी नाव सांगा अशी विनंती मुख्यमंत्र्याना केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांचं नाव घेतलं.
दादाही हसले
मुख्यमंत्र्यांनी नाव घेताच अजित पवार यांनी उभं राहून हात जोडत सर्वांना अभिवादन केलं. त्यानंतर अजित पवार खाली बसत असतानाच समोर बसलेल्या जयंत पाटील यांनी अजित पवार यांना चिमटा काढला. त्यांची-आमची जुनी ओळख आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. जयंत पाटील यांनी हा टोला लगावताच सभागृहात एकच खसखस पिकली. यावेळी अजित पवारही गालातल्या गालात मिश्किल हसले.
नऊ मंत्र्यांचा परिचय
अजित पवार यांचा परिचय करून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी इतर आठ मंत्र्याचा एक एक करून परिचय करून दिला. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्मरावबाबा अत्राम, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, आदिती तटकरे आदी मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी परिचय करून दिला. तसेच त्यांच्या खात्याचीही माहिती दिली.