गांधी कुटुंबाने काँग्रेसचं नेतृत्व सोडावं, आता इतरांना संधी द्या; कपिल सिब्बल यांचा गांधी कुटुंबाला मोठा झटका
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत मोठं अपयश आल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आता थेट पक्ष नेतृत्वालाच सवाल करण्यास सुरुवात केली आहे. स्वत: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्वावर सवाल केले आहेत.
नवी दिल्ली: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत मोठं अपयश आल्यानंतर काँग्रेसच्या (congress) ज्येष्ठ नेत्यांनी आता थेट पक्ष नेतृत्वालाच सवाल करण्यास सुरुवात केली आहे. स्वत: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल (kapil sibal) यांनी पक्षनेतृत्वावर सवाल केले आहेत. गांधी कुटुंबाने आता काँग्रेसचं नेतृत्वं सोडावं आणि इतरांना संधी द्यावी. काँग्रेस सर्वांचीच व्हायला हवी, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सिब्बल यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (priyanka gandhi) यांनी आज पाच राज्यातील पराभवाची समीक्षा करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्याआधीच कपिल सिब्बल यांनी हा बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे या बैठकीतही सिब्बल यांच्या मागणीचे पडसाद उमटतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आता कुटुंबाची काँग्रेस ऐवजी सर्वांची काँग्रेस होण्याची गरज आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाचे मला आश्चर्य वाटले नाही. त्याचा मला आधीच अंदाज होता. 2014पासून आमची सातत्याने घसरण होत आहे. आम्ही एकापाठोपाठ एक राज्य गमावत आहोत. ज्या राज्यात आम्हाला यश मिळालं, तिथले कार्यकर्तेही सोबत ठेवण्यात आम्ही अपयशी ठरलो. या दरम्यान काँग्रेसचे प्रमुख नेते गायब झाले आहेत. जे नेतृत्व करू शकत होते ते काँग्रेसपासून दूर जात आहेत. 2022च्या विधानसभा निवडणुकीतही नेतृत्व करू शकणारे नेते सोडून गेले आहेत. मी आकडे पाहत होतो. त्यातून आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. 2014पासून आतापर्यंत 177 खासदार, आमदारांसह आणि सुमारे 222 उमेदवार काँग्रेसला सोडून गेले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षातून एवढ्या मोठ्या प्रमाणवर नेते सोडून गेल्याचं कधीच पाहिलं नाही, असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं.
निकालाचं आश्चर्य वाटलं नाही
आम्हाला वारंवार पराभव पत्करावा लागत आहे. ज्या राज्यात आमचं अस्तित्व राहील असं वाटत होतं. त्या राज्यात आमच्या मतांची टक्केवारी नसल्यातच जमा आहे. उत्तर प्रदेशात आमच्याकडे 2.33 टक्के मते आहेत. त्याचं मला आश्चर्य वाटत नाही. आम्ही मतदारांना आमच्याकडे खेचून आणण्यात अपयशी ठरलो आहोत. आम्ही नेतृत्व करण्यात अपयशी ठरत आहोत. लोकांपर्यंत पोहोचण्यात अयशस्वी ठरत आहोत. आम्ही मतदारांपर्यंत का पोहोचत नाही हा सार्वजनिक चर्चेचा विषय आहे. नेत्यांमध्ये सामान्यांपर्यंत पोहोचणे, उत्तरदायित्व घेणे आणि स्वीकारण्याचे गुण असावेत असं काल गुलाम नबी आझाद म्हणाले होते. 2014पासून आमच्यात उत्तरदायित्व घेण्याची गोष्टच उरली नसल्याचं दिसून येतं. हे सर्व आमचे दोष असून तीच खरी समस्या आहे. त्यामुळेच मला निकालांचं आश्चर्य वाटलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
दिल्ली हिंसाचार : इशरत जहाँला जामीन मंजूर; उमर खालिदचा फैसला बाकी
‘द काश्मीर फाइल्स’ : जन्मापेक्षा मृत्यू अधिक पाहिलेल्या काश्मिरी पंडितांचं कटू सत्य