Sanjay Raut : संजय राऊतांना हिशोब तर द्यावाच लागणार, परदेशवाऱ्यांसाठी पैसा आला कुठून?; सोमय्यांचा सवाल
Sanjay Raut : संजय राऊत आणि तत्कालीन सरकारने माफिया पद्धतीने महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं होतं. राऊत हे प्रत्येक व्यक्तीला तुरुंगात टाकणार असल्याचं सांगत होते. धमक्या देत होते. काही लोकांना आतही टाकलं आहे. पत्राचाळमध्ये 1200 कोटींचा घोटाळा झाला.
मुंबई: गोरेगावच्या 1 हजार 34 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी छापेमारी केली आहे. राऊत यांच्या घरी सकाळीच ईडीचे अधिकारी (ED) आणि सीआरपीएफचे जवान दाखल झाले. राऊत यांच्या घराची झाडाझडती सुरू करण्यात आली असून त्यांच्याकडील कागदपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. तसेच राऊत यांची चौकशीही केली जाणार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे राऊत यांची कोंडी झाली आहे. याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांची जागा नवाब मलिक यांच्या शेजारीच असावी अशी राज्यातील साडेबारा कोटी जनतेची इच्छा आहे, असं सोमय्या म्हणाले. तसेच राऊत हे परदेशात कुटुंबासह फिरायला जात होते. त्याचा पैसा आला कुठून? त्यांचे हॉटेलचे बिल कोण देत होते? असा सवाल करतानाच राऊतांना हिशोब तर द्यावाच लागणार, असं सोमय्या म्हणाले.
संजय राऊत आणि तत्कालीन सरकारने माफिया पद्धतीने महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं होतं. राऊत हे प्रत्येक व्यक्तीला तुरुंगात टाकणार असल्याचं सांगत होते. धमक्या देत होते. काही लोकांना आतही टाकलं आहे. पत्राचाळमध्ये 1200 कोटींचा घोटाळा झाला. त्यासोबत नायगाव वसई प्रकरण बाहेर यायचं आहे. मलिकांच्या शेजारी राऊतांची जागा व्हायला हवी असं महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेची इच्छा आहे. हे राऊत धमक्या देत होते. पळापळ करत होते. हिशोब देत नव्हते. आता त्यांना हिशोब द्यावा लागणार आहे, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
विमान आणि हॉटेलाची तिकीट कोण देत होते?
पत्राचाळ प्रकरणी मीच मीडियाला पुरावे दिले आहे. जिथे तक्रारी केल्या. त्यांनाही पुरावे दिले. राऊतांच्या विदेशवाऱ्या व्हायच्या, कुटुंबासह परदेशात जायचे. विमानाचे तिकीट, हॉटेलची बिले कोण देत होते? प्रवीण राऊत आणि बाकीच्यांचे संबंध कशा प्रकारे आहेत? हिशोब तर द्यावेच लागतात, असं सांगतानाच या प्रकरणी माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, असंही ते म्हणाले.
कर नाही, त्याला डर नाही
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. राऊतांनी तपास यंत्रणांना काम करू दिलं पाहिजे. कर नाही, त्याला डर नाही. राऊत पत्रावाला चाळीची माहिती ईडीला देतील याचा विश्वास आहे. अनेक लोक आहेत जे राजकारणात नाही, त्यांचीही चौकशी झाली. भाजपवर ते आरोप करतात का? तपास यंत्रणांकडे काही माहिती असते तेव्हा ते अशा पद्धतीने कारवाई करतात, असं मुनगंटीवार म्हणाले.