किशोरी पेडणेकरांची आशिष शेलारांविरोधात तक्रार; शेलार आज पोलीस स्टेशनला हजर राहण्याची शक्यता
महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांनी शेलार यांच्या घरासमोर रात्री गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांकडून शेलार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला होता. मात्र आज सकारी वातावरण शांत असून, बंदोबस्त देखील कमी करण्यात आला आहे.
मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आणि भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यातील वाद आता पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Thane) बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला. दरम्यान पेडणेकर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांनी शेलार यांच्या घरासमोर गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांकडून शेलार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला होता. दुसरीकडे जबाब नोंदवण्यासाठी मरिन ड्राईव्ह पोलीस आज शेलार यांना पोलीस ठाण्यात बोलावू शकतात.
पोलीस बंदोबस्तात शिथिलता
महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलार यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळाले. शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर संतप्त कार्याकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी केली होती. शेलार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. गर्दी वाढल्याने निवासस्थानाबाहेरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. मात्र आज सकाळी वातावरण शांत झाले असून, सुरक्षा व्यवस्थाही कमी करण्यात आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
वरळी बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटप्रकरणात आशिष शेलार यांनी महापालिकेवर गंभीर आरोप केले आहेत. आशिष शेलार यांनी भाजपाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. वरळी बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटातील जखमींना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाला आणि आता बाळाच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेवर शेलार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या मोठ्या दुर्घटनेनंतर रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी जातात. पण तिथे सुरक्षित नाही. रुग्णांवर वेळेवर औषधोपचार होत नाहीत. मुंबईच्या महापौर घटनेनंतर 72 तासांनी रुग्णालयात पोहोचल्या. 72 तास कुठे होतात? मुंबई पालिकेत चाललंय काय? असे अनेक सवाल शेलार यांनी उपस्थित केले होते. त्यानंतर पेडणेकर यांनी शेलारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित बातम्या
Ajit Pawar | प्रतिस्पर्ध्याचा अर्ज मागे, पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवार पहिल्यांदाच बिनविरोध
पंकजा मुंडेंचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; 12 डिसेंबरला संकल्प जाहीर करण्याचा मनोदय