पान टपरीवाला ते आमदार; ‘आपला कामाचा माणूस’ अण्णा बनसोडेंबद्दल घ्या जाणून!
अण्णा दादू बनसोडे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. पिंपरी चिंचवड राखीव मतदारसंघातून ते विजयी झालेले आहेत. (Anna Bansode)
मुंबई: अण्णा दादू बनसोडे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. पिंपरी चिंचवड राखीव मतदारसंघातून ते विजयी झालेले आहेत. 2009 आणि 2019मध्ये ते पिंपरीतून निवडून आले आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट होती. या लाटेत भल्या भल्यांचा पराभव झाला. अण्णा बनसोडे यांचाही या लाटेत पराभव झाला होता. साधा पान टपरीवाला ते आमदार हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा. (know about Ajit Pawar loyalist anna bansodes political journey)
टॅग लाईनने जिंकून दिलं
अण्णा बनसोडे यांचा 2014च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे त्यांनी 2019च्या विधानसभेसाठी पुन्हा तयारी केली. या निवडणुकीत त्यांनी ‘आपला कामाचा माणूस’ अशी टॅग लाईन घेऊन प्रचार केला. ‘आपला कामाचा माणूस’ हे वाक्य त्यांनी लोकप्रिय केलं आणि घरोघरीही पोहोचवलं, त्यामुळे ते प्रचंड मतांनी विजयी झाले. अण्णा बनसोडे यांनी 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा 16 हजार 856 मतांनी पराभव केला होता. 2014 मध्ये अण्णा बनसोडे यांचा गौतम चाबुकस्वार यांनी 2 हजार मतांनी पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी पिंपरी मतदारसंघात जनसंपर्क वाढवला होता.
तीनदा नगरसेवक
अण्णा बनसोडे यांचा राजकीय प्रवास अतिशय रंजक आहे. बनसोडे यांच्या घरात राजकारण नव्हतं. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे त्यांनी काही काळ पान टपरी चालवली. पान टपरी चालवता चालवता त्यांनी राजकारणात भाग घ्यायला सुरुवात केली. याच काळात त्यांनी महापालिका निवडणूक लढवली आणि ते नगरसेवक म्हणून विजयी झाले. तीन वेळा ते महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. विशेष म्हणजे वेगवेगळ्या वॉर्डातून ते विजयी झाले आहेत. महापालिकेत स्थायी समिती सदस्य आणि अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. पुढे अजितदादा पवारांच्या संपर्कात आले आणि दादांचे विश्वासू सहकारीही बनले. त्यामुळे त्यांचा विधानसभेत पोहोचण्याचा मार्गही सोपा झाला. विशेष म्हणजे ज्या पानटपरीवरून त्यांचं राजकारण सुरू झालं. त्याच पान टपरीच्यावर त्यांचं जनसंपर्क कार्यालय आहे.
उमेदवारी नाकारली, उमेदवारी स्वीकारली
2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे बनसोडे प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतानाच अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राष्ट्रवादीतील एकाधिकारशाहीवर जोरदार हल्लाही केला होता. उद्या अजित पवारांनी एबी फॉर्म दिला तरी मी उमेदवारी घेणार नाही, तसं मी लिहून द्यायला तयार आहे, अशी घोषणाच त्यांनी केली होती. परंतु, दुसऱ्या दिवशी अजित पवार यांनी त्यांना एबी फॉर्म पाठवल्यानंतर बनसोडे यांनी हा फॉर्म स्वीकारला आणि उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर ते अजित पवारांचे खंदे समर्थक बनले होते.
लसीकरणासाठी 25 लाख देणारा पहिला आमदार
कोरोना संकटाच्या काळात अनेक नेते विविध पातळीवर काम करत होते. कोरोनाचा कहर कमी झाल्यावरही या नेत्यांचं काम सुरूच होतं. कोरोनाची लस आल्यानंतर बनसोडे यांनी त्यांच्या आमदार निधीतून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट 25 लाख रुपये दिले. तसेच या पैशातून मतदारसंघातील सर्वांचं लसीकरण करण्यास सांगितलं. आपल्या मतदारसंघातील नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी 25 लाखाचा निधी देणारे ते पहिलेच आमदार आहेत. त्या आधी पिंपरी-चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयात सिटीस्कॅन बसवण्यासाठी आमदार निधीतून सव्वा कोटी रुपये दिले होते.
थोडक्यात बचावले
मे 2021मध्ये बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यातून ते थोडक्यात बचावले होते. अण्णा बनसोडे यांनी अँथनी नावाच्या ठेकेदाराला वार्डातील दोन मुलांना कामाला लावं म्हणून सांगितलं होतं. त्यावेळी तो अरेरावी पद्धतीनं बोलला. सकाळी तो आला त्याच्यासोबत त्याचा मेव्हणा होता. त्या व्यक्तीनं गोळीबार केला, असं अण्णा बनसोडे म्हणाले होते. पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली होती. (know about Ajit Pawar loyalist anna bansodes political journey)
VIDEO : 100 Super Fast News100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 18 August 2021https://t.co/i1f1jjtCtb#100SuperFastNews #NewsBulletin #TV9
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 18, 2021
संबंधित बातम्या:
वडिलांच्या निधनानंतर पार्टी बदलली, टोकाचा निर्णय का घेतला?; वाचा निरंजन डावखरेंचं ‘राज’कारण!
शिवसेनेच्या गडाला खिंडार ते जन आशीर्वादचे सूत्रधार; कसं आहे संजय केळकर यांचं राजकारण?
‘पाणीवाली बाई’मुळे आयुष्याला टर्निंग पॉईंट मिळाला; वाचा, कशी आहे विद्या चव्हाणांची राजकीय जडणघडण!
(know about Ajit Pawar loyalist anna bansodes political journey)