Vinayak Mete Accident : ड्रायव्हरला डुलकी लागली, गाडीवरील नियंत्रण सुटलं की ट्रकने कट मारला?; विनायक मेटे यांच्या कारचा अपघात नेमका कसा झाला?
Vinayak Mete Accident :याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत आहे. खोपोलीच्या बोगद्याजवळ हा अपघात झाला. मोठ्या ट्रकला कारने पाठीमागून ठोकल्याचं कळतं, असं अशोक दुधे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.
नवी मुंबई: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (vinayak mete) यांचं आज पहाटे अपघाती निधन झालं. मेटे यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर (maharashtra) शोककळा पसरली आहे. मेटे यांचा अपघात अत्यंत गंभीर होता. या अपघातात त्यांच्या कारचा चक्काचूर झाला. कारचे दोन्ही दरवाजे डॅमेज झाले. कारचा पुढच्या भागाची प्रचंड नासधूस झाली. मेटे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. तासभर उपचार न मिळाल्याने त्यांचं निधन झाल्याचं त्यांच्या चालकाने सांगितलं. मेटे यांच्या कारचा अपघात (accident) नेमका कसा झाला? याचं कोडं अजूनही उलगडलं नाहीये. काहींच्या मते, मेटेंच्या चालकाला डुलकी लागली असावी, त्यामुळे त्यांचा अपघात झाला. तर काहींच्या मते ट्रकने मेटे यांच्या गाडीला कट मारला आणि अपघात झाला असावा. काहींनी तर या अपघातामागे घातपाताची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे मेटे यांच्या कारचा अपघात नेमका झाला कसा? याबाबतचं गुढ कायम आहे.
गाडीवरील ताबा सुटला?
पहिल्या शक्यतेनुसार मेटे यांच्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्यांची कार दुसऱ्या वाहनावर जाऊन आदळली. त्यामुळे हा अपघात झाला असावा. गाडी दुसऱ्या वाहनावर आदळल्यानेच कारचा चक्काचूर झाला असल्याचं सांगितलं जात आहे.
ट्रकचालकाने कट मारला
विनायक मेटे यांचे चालक एकनाथ कदम यांनी या अपघाताची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका ट्रकने कट मारला. त्यामुळे अपघात झाला. अपघातानंतर त्यांना तासभर मदत मिळाली नाही. मदतीसाठी प्रत्येकाला विनवणी केली. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना हात दाखवला. वाहने थांबावीत म्हणून रस्त्यावर झोपलो. पण कोणीही मदत केली नसल्याचं कदम यांनी सांगितलं.
चालकाला डुलकी लागली?
दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वेगळी शक्यता वर्तवली आहे. विनायक मेटे यांचा रात्रभर प्रवास सुरू होता. सकाळी त्यांना मुंबईत यायचे होते. रात्रभर चालकाने गाडी चालवल्याने कदाचित त्याला डुलकी लागली असावी. त्यामुळे अपघात झाला असावा, असं अजित पवार म्हणाले. कुणाला या प्रकरणात घातपाताची शक्यता वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, असंही पवार म्हणाले.
पोलीस काय म्हणाले?
दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या पंचनाम्यात अपघाताचं नेमकं कारण दिलं आहे. मेटे हे मुंबईकडे दुसऱ्या लेनने जात होते. कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर मारून अपघात झाला, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
पोलीस अधीक्षक घटनास्थळी
दरम्यान, पोलीस अधीक्षक अशोक दुधे घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मेटे यांच्या कारला पहाटे अपघात झाला. पुण्यावरून मुंबईला येत असताना हा अपघात झाला. गाडीमध्ये तीन व्यक्ती होते. त्यातील दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. तर मेटे यांचा मृत्यू झाला आहे. जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत आहे. खोपोलीच्या बोगद्याजवळ हा अपघात झाला. मोठ्या ट्रकला कारने पाठीमागून ठोकल्याचं कळतं, असं अशोक दुधे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.