NCP Shivsena BJP: फडणवीसांसह भाजपबद्दल अजित पवार, वळसे पाटील तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सॉप्ट कॉर्नर? 5 नेत्यांचे 5 वक्तव्य पाहा
तपास यंत्रणांकडून आघाडीतील नेत्यांच्या घरावर धाडी पडत आहेत. राष्ट्रवादीचे दोन मंत्री तर तुरुंगात आहेत. मात्र, तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांना अजूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांबाबत सॉफ्ट कॉर्नर असल्याचं दिसून येतं.
मुंबई: तपास यंत्रणांकडून आघाडीतील नेत्यांच्या घरावर धाडी पडत आहेत. राष्ट्रवादीचे दोन मंत्री तर तुरुंगात आहेत. मात्र, तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांना अजूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि भाजपच्या इतर नेत्यांबाबत सॉफ्ट कॉर्नर असल्याचं दिसून येतं. एवढंच नव्हे तर भाजपलाही राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत सॉफ्ट कॉर्नर असल्याचं दिसून येत आहे. विधानसभेतील आणि विधानसभेबाहेरील भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या विधानांवरून हे स्पष्ट होतं. भाजप (bjp) आणि राष्ट्रवादीत (ncp) पहाटेचा शपथविधी झाला होता. हे सरकार फार काळ टिकलं नाही. मात्र, असा काही प्रयोग आगामी काळात होऊ शकतो. एक सक्षम मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादीची साथ आपल्याला लाभू शकते अशी भाजपला आशा आहे. त्यामुळेच भाजपकडून राष्टवादीच्या नेत्यांबाबत सकारात्मक विधाने केली जात आहे. दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होऊ नये याची काळजी हे नेते घेत असल्याने त्यातून अनेक अर्थ काढले जात आहेत.
राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांचे एकमेकांबाबतचे सॉफ्ट कॉर्नर कसे आहेत हे पुढील व्हिडिओतून दिसून येईल. या व्हिडिओत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिक्रिया आहेत. या प्रतिक्रियेतून सर्वच नेते कसे एकमेकांना सांभाळून घेत आहेत हे स्पष्ट होतं. त्यांच्या विधानातून अनेक राजकीय अर्थही काढले जातात. काही नेत्यांची विधाने खालील प्रमाणे…
डिटेक्टिव्ह एजन्सी काढलीय का?
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांना थेट डिटेक्टिव्ह एजन्सी काढलीय का? असा सवाल केला होता. तुम्ही मुख्यमंत्री असताना राज ठाकरेंना 33 हजार विहिरींचा जलयुक्त शिवाराचा आपण एक पेन ड्राईव्ह दिला होता. मागच्या अधिवेशनात 6. 5 चा पेन ड्राईव्ह दिला होता. दोन दिवसांपूर्वी आपण एक पेन ड्राईव्ह दिला. आज आपण परत एक पेन ड्राईव्ह दिला. म्हणजे आपण डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय?, असा सवाल दिलीप वळसे यांनी देवेंद्र फडणवीसांना केला. मात्र, फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बवर हल्लाबोल करण्याऐवजी वळसे पाटील यांनी हा मिश्किल सवार करून विषयातील गांभार्य घालवल्याने त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले गेले.
दादांमध्ये धमक, बाकीचे हेकट
चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्तुती केली. एसटीच्या कामगारांच्या संपावर अजित पवारच तोडगा काढू शकतात असा षटकारच त्यांनी लगावला होता. दत्ता सामंतांच्या संपामध्ये एक लाख कामगारांची घरे उद्ध्वस्त झाली. हे मला आजही आठवतंय. ही एक लाख घरे आजही उद्ध्वस्त होतील. त्यामुळे अजितदादांकडूनच अपेक्षा आहे. लगेच त्याचा अर्थ लावू नका की अजितदादा बाहेर पडणार आहे का? आणि भाजपने संकेत दिले आहेत का? पण अजितदादांमध्ये ही धमक आहे. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद सुरू केला आहे. अजितदादांची स्टाईल कशी असते… हई 31 तारखेच्या आत ज्वॉईन व्हा. नंतर मग संधी मिळणार नाही. दादांना एवढंच म्हणेल जरा प्रेमाने घ्या. एसटी कामगार चार महिने संत्रस्त आहेत. नंतर मग प्रेमाने बोललात गॅरंटी दिली तर सर्व येतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
सर्व आमदार अजितदादा कुछ करो म्हणतात हे खरं आहे. दादांना हो तर हो आणि नाही तर नाही हे म्हणता येतं. परवा त्यांनी सभागृहात इनडायरेक्टली सांगून टाकलं वाईनचा निर्णय आम्ही गुंडाळून टाकला. हे फक्त दादाच करू शकतात. बाकीचे हेकट आहेत. आम्ही निर्णय घेतला, मागे घेतला मागे हटणार नाही, असं बोलणारे हे नेते आहेत. काय सांगावं यांना… त्यामुळे एसटीचा संप मिटायचा असेल तर दादांनी पुढाकार घेतला पाहिजे, असं ते म्हणाले.
अजितदादांनी डंकेकी चोटपर काम केलं
अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पाचं आकारमान 5 लाख 48 हजार 747 कोटी इतकं आहे. त्यापैकी राष्ट्रवादीच्या खात्यांना 3 लाख 14 हजार 820 म्हणजे 57 टक्के निधी देण्यात आला. काँग्रेसच्या खात्यांना 1 लाख 44 हजार 193 कोटी देण्यात आले. म्हणजे 26 टक्के निधी दिला गेला. शिवसेनेला 90 हजार 181 कोटी म्हणजे 16 टक्के निधी दिला गेला. विशेष म्हणजे जिथे पगार द्यावा लागतो अशी खाती राष्ट्रवादीकडे नाहीये. ती खाती काँग्रेसकडे आहेत. शिक्षण विभाग काँग्रेसकडे आहे. तर उच्च शिक्षण विभाग शिवसेनेकडे आहे. तरीही शिवसेनेला त्याची काळजीच नाही. ज्यांना काळजी आहे त्यांच्यासाठी सांगतो. अजितदादांना मानलंच पाहिजे. डंके की चोटपर त्यांनी काम केलं. मागच्यावेळी हेच केलं. यावेळीही हेच. असं पाहिजे काम. एकदम ठाम. सर्व पैसा राष्ट्रवादीकडे. म्हणजे 57 टक्के निधी राष्ट्रवादीकडे, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचले.
अजितदादा, पैसा देताना राष्ट्रवादीसाठी कसा जोरात राखून ठेवता. तुम्ही दोनदा घोषणा केली. 500 ते 700 रुपये भरले तरी मे पर्यंत शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापणार नाही, असं तुम्ही म्हटलं होतं. कुठे गेली तुमची घोषणा? तुमच्या पंचसूत्रीत पाणी दिसतंय, पीक दिसतंय आणि वीज नाहीये. कसली पंचसूत्री? शेतकरी पंचतत्त्वात विलीन होतोय आणि कसली पंचसूत्री. गावोगावी हा आक्रोश वाढतोय, असंही ते म्हणाले.
तुम्ही अनुभवी, आम्हाला मार्गदर्शन करा
मी विरोधी पक्षनेत्यांच्या एकच मुद्दा लक्षात आणून देतो. काल तुम्ही व्हिसल ब्लोअरबाबत बोलला. मी हा कायदा कधी पाहिला नव्हता. पण सहज मी काढून पाहिला. त्यात तुमचं म्हणणं बरोबर आहे. केंद्रीय गृहसचिवांना तुम्ही पेनड्राईव्ह दिला. सभागृहात दिला. त्यात काय मला माहीत नाही. पण मला असं वाटतं की त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही मांडत राहा. पण मांडत असताना, तुम्ही पाच वर्ष अनुभवी मुख्यमंत्री, गृहमंत्री राहिला आहात. एक अनुभवी म्हणून तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. मार्गदर्शन करायचं काम करा. काही प्रश्न निर्माण झाले तर जशी नेहमी मदत करता तशी मदत करण्याचा प्रयत्न करा. एवढंच सांगतो. प्रश्न निर्माण करू नका, असं दिलीप वळसे पाटील सभागृहात म्हणाले.
नाईट वॉचमनसारखं खेळलात
दिलीप वळसे पाटलांनी स्तुती केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही त्याची सव्याज परतफेड केली. खरं म्हणजे दिलीपरावांना गेली 22 वर्ष मी या सभागृहात पाहतोय. पण एवढे हतबल दिलीपराव पहिल्यांदा पाहिले. तरीही तुमचं अभिनंदन करतो. हिट विकेटवर असतानाही नाईट वॉचमनसारखे खेळलात तुम्ही, असं फडणवीस म्हणाले.
पहिल्यांदा तर एनआयएने बॉम्बस्फोटाचा एफआयआर नाही केला. आता जो एफआयआर केला तो मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भातला टेरर फंडिगच्या संदर्भातला आणि इथल्या इथे कसे मनी लॉन्ड्रिंग होतात त्याचा एफआयआर केला. त्याच्या तपासात हे बाहेर निघालं आहे. त्या संदर्भात आलं आहे. प्रश्न एवढाच आहे की सरदार शहावली खान बॉम्ब स्फोटाचा आरोपी आहे, सलिम पटेल हा दाऊदचा फ्रंट मॅन आहे. त्यांच्याकडून खरेदी करायचं मार्केट रेटपेक्षा कमी भावात आणि मूळ मालकाला एकही पैसा मिळाला नाही. त्यामुळे ही काही साधी गोष्ट नाही झाली. कुणाला तरी पकडून जेलमध्ये नाही टाकलं. यात सर्व पुरावे आल्यावर कारवाई झाली आहे. पण कोर्ट सांगेल. उच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्यात बेल मिळू शकते माहीत नाही. ठिक आहे तुम्हाला त्यांना वाचवावच लागेल. अनिल देशमुखांवर कुणी केला एफआयआर? आम्ही नाही. कोर्टाने आदेश दिले आणि एफआयआर झाला, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
Congress: काँग्रेस आमदार नाराज नाहीत? काय सांगता, कैलास गोरंट्याल म्हणतात, अडीच वर्षे होऊन गेली….