आणखी एक शिवसेना, ती म्हणेल हो, माझं नाव ‘शिवसेना’, शिवसैनिक म्हणेल, हो माझीच ‘शिवसेना’
आधी हे नाव ऐकून मला प्रश्न पडला. पण आपल्या पक्षाचं नाव आणि त्यांनी मुलीचं नाव शिवसेना ठेवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पण मला हे नाव ऐकून आश्चर्य वाटलं.
रायगड: शिवसेनेत फूट पडून शिवसेनेचे दोन गट झाले. आमदारांमधील अस्वस्थेतून ही फूट पडली. दोन्हीकडच्या महत्त्वाच्या नेत्यांनी फूट टाळण्यासाठी तोडगा काढण्यावर भर दिला नाही. उलट एकमेकांवर शेरेबाजी केली. एकमेकांपासून दुरावा निर्माण होईल अशी विधाने केली आणि दोन वेगवेगळ्या चुली मांडल्या. या सर्व घडामोडीत होरपळला गेला तो सामान्य शिवसैनिक. ज्या पक्षाला लेकरासारखं वाढवलं. त्याचं संगोपन केलं. त्याच पक्षाची डोळ्यासमोर वाताहात होताना पाहून शिवसैनिक अस्वस्थ झालेला आपण पाहिला. आता पुन्हा एका घटनेने शिवसैनिकाचं शिवसेनेवर किती अफाट आणि अतूट प्रेम आहे हे दिसून आलंय. रायगडमधील एका कट्टर शिवसैनिकाने आपल्या मुलीचं नाव चक्क ‘शिवसेना’ असंच ठेवलं आहे. त्याने हा नामकरण सोहळा थाटात पारही पाडला.
महाड तालुक्यातील किये-गोठवली येथील माजी उपसरपंच पांडुरंग वाडकर यांनी आपल्या मुलीचं नाव ‘शिवसेना’ ठेवलं आहे. वाडकर यांच्या घरी कन्यारत्नाचा लाभ झाला. 17 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मुलीचा जन्म झाला. त्याच दिवशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन होता.
मुलीच्या जन्माच्या आदल्या रात्री पांडुरंग वाडकर यांच्या स्वप्नात साक्षात बाळासाहेब ठाकरे आले आणि त्यांनीच त्यांना मुलीचं नाव शिवसेना असं ठेवायला सांगितलं.
बाळासाहेब स्वप्नात आले. त्यांनी आदेश दिला. साक्षात बाळासाहेबांचा आदेश म्हटल्यावर तो पाळणार नाही तो शिवसैनिक कसला? बाळासाहेबांचा हा आदेश शिरसावंद्य मानून वाडकर यांनी आपल्या मुलीचं नाव शिवसेना ठेवलं.
त्यासाठी नामकरण सोहळा आयोजित केला. पंचक्रोशीला निमंत्रण दिलं. आमदार भरतशेठ गोगावले आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही निमंत्रण दिलं. मैदानात मोठा स्टेज टाकला. स्टेज सजवला.
स्टेजवर मोठा बॅनर लावला. बॅनरवर बाळासाहेबांचा भला मोठा फोटो होता. बॅनरवरील महाराष्ट्राच्या नकाशात माझं नाव शिवसेना… असं लिहिलं होतं. लायटिंग करण्यात आली होती. पाहुण्यांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवल्या होत्या.
तसेच या सोहळ्याला आलेल्यांसाठी भोजनाची व्यवस्था ठेवण्यात आली होती. या सर्व उत्साही वातावरणात वाडकर आणि कुटुंबीयांनी जाहीरपणे आपल्या कन्येचं नाव शिवसेना असं ठेवलं.
बाळासाहेबांचा स्मृती दिन होता. त्याच दिवशी 17 तारखेला माझ्या घरात मुलगी जन्माला आली. सकाळी 7 वाजता मुलीचा जन्म झाला. त्या रात्री बाळासाहेब स्वप्नात आले. त्यांनी हे नाव सूचवलं. बाळासाहेब माझे दैवत आहेत. भरतशेठ हे माझे नेते आहेत. त्यामुळे मी बाळासाहेबांचा आदेश मानून मुलीचं नाव शिवसेना ठेवलं, असं वाडकर म्हणाले.
आधी हे नाव ऐकून मला प्रश्न पडला. पण आपल्या पक्षाचं नाव आणि त्यांनी मुलीचं नाव शिवसेना ठेवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पण मला हे नाव ऐकून आश्चर्य वाटलं. मी म्हटलं तुम्ही ठाकरे गटात आहात की शिंदे गटात? त्यावर ते म्हणाले. बाळासाहेबांची शिवसेना म्हणून मला मुलीचं नाव ठेवायचं होतं. म्हणून ठेवलं, अशी माहिती विकासशेठ गोगावले यांनी सांगितलं.
या नामकरण सोहळ्याला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे युवासेना कोअर कमिटी सदस्य विकासशेट गोगावले, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, उपविभाग प्रमुख गोपिनाथ सावंत, प्रविण मांडरे, सरपंच नारायण वाडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.