लोकसभेच्या आज निवडणुका झाल्या तर केंद्रात पुन्हा भाजपच, उद्धव ठाकरे यांना अच्छे दिन; काय आहे सर्व्हे?
या सर्व्हेतून उद्धव ठाकरे यांना मोठा फायदा होताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्या गटाला 11 जागा मिळताना दिसत आहेत. तर शिंदे गटाला केवळ 2 जागा मिळताना दिसत आहेत.
नवी दिल्ली | 31 जुलै 2023 : आगामी 2024ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी देशभरातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. इकडे विरोधकांनी इंडिया आघाडी तयार करून भाजपसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे भाजपने एनडीएचं पुनरुज्जीवन करून इंडिया आघाडीला तोडीसतोड उत्तर दिलं आहे. त्यामुळे देशभरातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने एक निवडणूक सर्व्हेही आला आहे. त्यातील आकडे बघता पुन्हा एकदा देशात भाजपचीच सत्ता येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, यावेळच्या लोकसभेत विरोधी पक्षांचा आवाजही बुलंद असणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे.
इंडिया टीव्ही सीएनएक्सने हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेच्यानुसार अनेक राज्यात एनडीए आणि इंडिया आघाडीत थेट लढत होणार आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला यावेळी तीनपट जागा मिळण्याचा अंदाज या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे. तर मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा एकदा केंद्रात येणार असल्याचंही या सर्व्हेतून स्पष्ट झालं आहे.
काँग्रेसचं बळ वाढणार
विद्यमान लोकसभेत काँग्रेसचे 52 खासदार आहेत. त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच इंडिया आघाडीला एकूण 175 जागा मिळणआर आहेत. त्यामुळे पुढील लोकसभेत भाजपला मजबूत विरोधी पक्षाचा मुकाबला करावा लागणार आहे. एनडीए आघाडीला 318 जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढच्यावर्षी जर पुन्हा मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे ते दुसरे पंतप्रधान ठरणार आहेत.
डरकाळी उद्धव ठाकरेंचीच
या सर्व्हेतून उद्धव ठाकरे यांना मोठा फायदा होताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्या गटाला 11 जागा मिळताना दिसत आहेत. तर शिंदे गटाला केवळ 2 जागा मिळताना दिसत आहेत. शिंदे गटाकडे एकूण 13 खासदार आहेत. म्हणजे शिंदे गटाचे 12 खासदार या निवडणुकीत सपाटून मार खाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या फक्त पाच खासदार आहेत. मात्र, सर्व्हेनुसार ठाकरे गटाचे 11 खासदार निवडून येणार आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे यांना सहा जागांचा फायदा होताना दिसत आहे.
मात्र, शिवसेना फुटल्याने शिवसेनेच्या खासदारांची एकूण संख्या घटणार असल्याचं दिसून येत आहे. मागच्या निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते. यावेळी शिंदे आणि ठाकरे गटाचे मिळून 13 खासदार निवडून येणार असल्याचा अंदाज आहे. म्हणजे शिवसेनेला एकूण पाच जागांचा फटका बसणार असल्याचंही दिसत आहे. दरम्यान, शिवसेनेतील फुटीचा भाजपला फारसा फायदा होताना दिसत नसून उद्धव ठाकरे यांच्याच पाठी संघटन असल्याचं स्पष्ट होत आहे.
कुणाला किती जागा
एनडीए – 318
इंडिया आघाडी – 175
इतर – 50
कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
बीजेपी- 290 काँग्रेस- 66 आप-10 टीएमसी-29 बीजेडी-13 शिवसेना शिंदे- 02 शिवसेना उद्धव- 11 एसपी- 04 आरजेडी- 07 जेडीयू- 07 एआईएडीएमके- 08 एनसीपी- 04 एनसीपी अजित- 02 वायएसआरसी- 18 टीडीपी- 07 लेफ्ट फ्रंट- 08 बीआरएस- 08 इतर- 30