APMC Election 2023 | एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचा नेमका परफॉर्मन्स काय? बाजार समितींचे A to Z निकाल हाती
राज्यातल्या 147 बाजार समित्यांचे निकाल लागलेत. बाजार समित्यांच्या निवडणुका असल्या तरी सर्वच राजकीय पक्षांनी आपआपल्या पॅनलद्वारे चांगलीच ताकद लावली होती. बाजार समित्यांमध्ये कोणी बाजी मारली आणि महत्वाच्या लढतीत कोण वरचढ ठरलंय? याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल लागले आणि दिग्गज मंत्री, नेते, आमदारांना जबर झटका बसला. दिगज्जांच्या पॅनलचा पराभव झालाय. भाजपच्या पॅनलनं 40 बाजार समित्यांवर विजय मिळवलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 बाजार समित्या मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 38 बाजार समित्यांवर विजय मिळालाय. काँग्रेसचं पॅनल 31 बाजार समित्यांमध्ये विजयी झालंय. तर ठाकरे गट 11 ठिकाणी आणि इतरांच्या वाट्याला 18 बाजार समित्या गेल्या आहेत. युती आणि आघाडीच्या पॅनलचा विचार केला तर, महाविकास आघाडीच्या पॅनलला 81 बाजारसमित्यांवर विजय मिळाला. तर 48 बाजार समित्यांवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या पॅननकडे गेल्यात.
महाराष्ट्रातील महत्वाच्या लढती :
परळीत धनंजय मुंडे यांना पंकजांना धक्का
परळी बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंचा गट विजयी झालाय. धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या लढतीत भाजप नेत्या पंकजा मुंडेंना जबर धक्का बसला. 18 पैकी 18 जागा धनंजय मुंडे गटानं जिंकल्यात. अंबाजोगाई बाजार समितीतही धनंजय मुंडेंचीच सरशी आहे. पंकजा मुंडेंच्या गटाचा इथंही पराभव झाला. 18 पैकी 15 जागा धनंजय मुंडे गटाला मिळाल्या.
काका पुतण्याच्या लढाईत संदीप क्षीरसागर यांची बाजी
बीडमध्ये काका पुतण्याच्या लढाईत पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्या गटानं काका जयदत्त क्षीरसागरांच्या गटाला धोबीपछाड दिला. 18 पैकी 15 जागा संदीप क्षीरसागर यांच्या गटानं जिंकल्या.
भंडाऱ्यात नाना पटोलेंना धक्का
भंडाऱ्यातील लाखनी-साकोली बाजार समितीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना झटका बसला…राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीच्या पॅनलनं 18 पैकी 11 जागा जिंकल्या.
हर्षवर्धन जाधव यांना पत्नीकडून धक्का
छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड बाजार समितीत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या गटाला त्यांच्याच, पत्नी संजना जाधव यांच्या गटानं 18 पैकी 15 जागा जिंकत धूळ चारली.
अमरावतीत यशोमती ठाकूर यांची बाजी
अमरावती बाजार समितीत काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्या पॅनलनं बाजी मारली. 18 पैकी 18 जागा जिंकत रवी राणांच्या गटाचा पराभव झाला. ज्यात रवी राणांचे भाऊ सुनिल राणाही पराभूत झाले.
शिंदे गटाच्या आमदारांच्या परफॉर्मन्सवर काय?
- मालेगाव बाजार समितीत ठाकरे गटाचे अद्वैय हिरेंच्या पॅनलनं मंत्री दादा भूसेंच्या गटाचा पराभव केला. 18 पैकी 10 जागांवर अद्वैय हिरेंच्या पॅनलचा विजय झाला.
- यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस बाजार समितीत मंत्री संजय राठोडांना धक्का बसला. महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलनं 18 पैकी 14 जागा जिंकल्या.
- बुलडाणा बाजार समितीत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या गटाचा पराभव झाला. ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधवंत यांच्या गटानं 18 पैकी 12 जागा जिंकल्या.
- धाराशीव जिल्ह्यात परंडा बाजार समितीत मंत्री तानाजी सावंत यांच्या गटाला धक्का बसला. मविआच्या पॅनलनं 18 पैकी 11 जागांवर विजय मिळवला.
भाजपचं पॅनल नंबर 1, मात्र बाजी मविआची
बाजार समित्यांच्या निवडणुकांमधून ग्रामीण भागातला मूड लक्षात येतो. थेट पक्षाच्या चिन्हावर निवडणूका नसल्या तरी, त्या त्या पक्षाचं पॅनल असतेच. बाजार समित्यांचा एकूण निकाल पाहिला तर, भाजपचं पॅनल नंबर 1 वर आहे. मात्र युती आणि महाविकास आघाडीमध्ये. महाविकास आघाडीनं बाजी मारलीय.
भाजपच्या पॅनलनं 40 बाजार समित्यांवर विजय मिळवलाय. शिंदेंच्या शिवसेनेला 7 बाजार समित्या मिळाल्यात. राष्ट्रवादी 38 बाजार समित्या, काँग्रेसचं पॅनल 31 बाजार समित्यांमध्ये विजयी झालंय. ठाकरे गट 11 ठिकाणी आणि इतरांच्या वाट्याला 17 बाजार समित्या गेल्यात. युती आणि आघाडीच्या पॅनलचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या पॅनलला 81 बाजारसमित्यांवर विजय मिळाला. तर 48 बाजार समित्यांवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या पॅनलकडे गेल्यात.