मंत्रिपदाचं काऊंटडाऊन सुरू… बावनकुळे दिल्लीला रवाना, फडणवीस, शिंदे आणि अजितदादाही जाणार; फैसला आज-उद्याच होणार?
महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारातील अडचणींमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. गृह आणि महसूल खात्यांवरून शिंदे गट आणि भाजपात मतभेद असल्याने विस्तार रखडला आहे. या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी अमित शाह यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील बैठकीत खातेवाटपावर निर्णय अपेक्षित आहे.
राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतरही अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आलेली नाही. शिंदे गटाला गृह आणि महसूल खातं हवं असल्याने मंत्रिपदाचा घोळ कायम आहे. हा तिढा सुटता सुटत नसल्याने आता प्रश्न दिल्ली दरबारी जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. त्यातच या दोन्ही खात्यांचा निकाल लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला रवाना झाले आहेत. तिन्ही नेतेही दिल्लीला जाणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काल मेघदूत बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची रात्री दीड वाजेपर्यंत चर्चा झाली. मंत्रिमंडळात किती मंत्री असावेत, किती कॅबिनेट आणि किती राज्यमंत्री असावेत आणि कुणाला कोणती खाती द्यावी याची चर्चा कालच्या बैठकीत झाली. कालच्या बैठकीत पालकमंत्रीपद आणि महामंडळावरही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, गृहमंत्रिपद आणि महसूल मंत्रिपदावर कोणताच तोडगा निघाला नसल्याचं सांगण्यात आलं. दोन्ही खात्याचा तिढा सुटत नसल्याने आमदारांना मंत्रिपदाची शपथही देता येत नाही. त्यामुळे हा प्रश्न आता थेट अमित शाह यांच्या दरबारात नेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
बावनकुळे दिल्लीकडे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आज दुपारीच दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत अमित शाह यांची हे चारही नेते भेटणार आहेत. या भेटीत प्रामुख्याने महसूल आणि गृहखात्यावर चर्चा होईल. तसेच त्याबदल्यात शिंदे गटाला जास्तीची खाती देता येणार का? यावरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
फैसला आजच?
दरम्यान, अमित शाह यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीतच खाते वाटपाचा तिढा सुटणार असल्याचं सांगितलं जात आहे. कारण राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार 14 किंवा 15 डिसेंबरला करण्याचं घटत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीतच तिढा सोडवून तिन्ही नेते परत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.