Maharashtra Cabinet : अखेर ठरलं… उद्या मंत्रिमंडळ विस्ताराची दाट शक्यता, भाजपकडून 4 ते शिंदे गटाकडून 4 आमदारांना फोन
आता उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळतेय. मंत्रिपदासाठी भाजपकडून 4 तर शिंदे गटातील 4 आमदारांना फोन गेल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार गेल्या महिनाभरापासून रखडला होता. मात्र, आता उद्याच मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होणार असल्याची माहिती मिळतेय. मंत्रिपदासाठी भाजपकडून 4 तर शिंदे गटातील 4 आमदारांना फोन गेल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपकडून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन यांना फोन गेला आहे. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, उदय सामंत, संजय शिरसाट, दादा भुसे आणि संदीपान भुमरे यांना फोन गेल्याची माहिती मिळत आहे.
आमदारांना फोन आणि मुंबईत पोहोचण्याचे आदेश
भाजपच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विखे पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांना मुंबईत बोलावण्यात आलं आहे. भाजप पक्षश्रेष्ठींचा या आमदारांना फोन गेला आणि त्यांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या आमदारांचं मंत्रिपद निश्चित मानलं जात आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडूनही गुलाबराव पाटील, उदय सामंत, संजय शिरसाट, दादा भुसे आणि संदीपान भुमरे यांना फोन गेले आहेत. त्यांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आलं असून शासकीय निवासस्थानीच थांबण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
सरकार स्थापनेत मोठी भूमिका बजावणाऱ्यांना संधी?
सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आमदारांनाही भाजपकडून संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय कुटे, बंडी भांगडिया, रविंद्र चव्हाण आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या नावाचीही चर्चा सुरु आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात 20 ते 25 आमदारांना मंत्रिपद देण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा टप्पाही लवकरच होईल असं सांगितलं जात आहे.
रात्री किंवा उद्यापर्यंत नावं निश्चित होणार- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईहून नांदेड दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. त्यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. मंत्रिपदाची नावं अद्याप निश्चित झाली नाहीत. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत नावं नक्की होतील, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.