धक्का बसणार? अब्दुल सत्तार, संजय राठोड नापास? रिपोर्ट कार्ड आलं, मंत्रीपदही जाणार?; लॉटरी कुणाकुणाला?
महाराष्ट्रातील नवीन सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया सुरू आहे. शिंदे गटाने माजी मंत्र्यांच्या कामगिरीचे अहवाल तयार केले आहेत, ज्यामध्ये काही माजी मंत्री नापास झाले आहेत. शिंदे गटाकडून मंत्रिपदाच्या इच्छुकांची यादी तयार करण्यात आली असून त्यामध्ये काहींना संधी मिळण्याची शक्यता आहे. यातून मंत्रिपदासाठी जोरदार स्पर्धा निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात नवं सरकार स्थापन झालं आहे. फडणवीस यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी झाला आहे. येत्या 12 तारखेपर्यंत इतर मंत्र्यांचा शपथविधी केला जाणार आहे. महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. आमदारांची संख्या वाढली आहे. त्यात अनुभवी आमदार मोठ्या प्रमाणावर आहेत. तर नवीन आमदारही मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या आमदारांना मंत्रीपद देण्यासाठी नेत्यांना कसरत करावी लागत आहे. अनेक आमदारांनी आपला नंबर लागावा म्हणून मोठी लॉबिंग सुरू केली आहे. मंत्रिपद देण्यासाठी शिंदे गटाने एका एजन्सीमार्फत मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड तयार केलं होतं. त्यात दोन मंत्री नापास ठरले असून मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंत्र्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी आणि संभाव्य मंत्र्यांचं तसंच इच्छुक आमदारांचं प्रगती पुस्तक शिवसेनेने तयार केले आहे. यात दोन माजी मंत्री नापास ठरले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार हे या नापास झाले आहेत. तर मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले पाच आमदार पास झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय राठोड हे विदर्भातून येतात आणि सत्तार हे मराठवाड्यातून येत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
यंदा तरी नंबर लागेल का?
भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, विजय शिवतारे आणि अर्जुन खोतकर हे मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. यातील काही नेत्यांनी आपली इच्छा वारंवार बोलून दाखवली आहे. काही लोकांचा मागच्या टर्ममध्येच नंबरही लागणार होता. तर काही इच्छुकांच्या समर्थकांनी भावी मंत्री म्हणून त्यांच्या मतदारसंघात बॅनरही लावले आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटाने केलेल्या पडताळणीत हे पाचही आमदार पास झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मंत्रिपद देणार की वेगळा काही निर्णय घेणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कसरत करावी लागणार
महायुतीमध्ये शिवसेनेला 13 ते 14 मंत्रिपद मिळणार असल्याची माहीती. यापैकी 10 ते 12 मंत्र्यांना याच आठवड्यात मंत्रिपदाची शपथ दिली जाणार. त्यामुळे मंत्र्यांची वर्णी लावणं ही एकनाथ शिंदे यांची मोठी डोकेदुखी असणार आहे. कारण शिंदे यांच्या शिवसेनेकडे 60 आमदारांचं बळ आहे. त्यापैकी फक्त 10 ते 12 आमदारांनाच मंत्रिपद दिलं जाणार असल्याने आमदार निवडताना एकनाथ शिंदे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शिवसेनेने इच्छुकांचं प्रगतीपुस्तक काढलं असलं तरी ऐनवेळी काय होतं हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे.
शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात पास झालेले संभाव्य मंत्री.
१) गुलाबराव पाटील
२) उदय सामंत
३) दादा भुसे
४) शंभूराजे देसाई
५) तानाजी सावंत
६) दीपक केसरकर
७) भरतशेठ गोगावले
८) संजय शिरसाट
९) प्रताप सरनाईक
१०) अर्जुन खोतकर
११) विजय शिवतारे