त्यांच्या पायाखालची वाळू सरकतेय, माझ्यावर पाळत ठेवली जातेय, नाना पटोलेंचे गंभीर आरोप
"महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. मी कुठे काय करतो ते सगळं त्यांना माहीत आहे", असं म्हणत नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे.
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. मी कुठे काय करतो ते सगळं त्यांना माहीत आहे”, असं म्हणत नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे. ते काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित होते.
नाना पटोले म्हणाले, “त्यांच्याकडे गृहमंत्री आणि मुख्यमंत्रिपद आहे. त्यामुळे यंत्रणांना सर्व रिपोर्ट त्यांना द्यावे लागतात. कुठे कुठे काय चालू आहे, आंदोलन कुठे काय चालू आहे, हे सगळं त्यांना अपडेट द्यावे लागतात. मी कुठे काय करतो ते सगळं त्यांना माहीत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. हे त्यांना माहीत नाही का? ते कुठे ना कुठे आपल्याला पिंजऱ्यात आणायचा प्रयत्न करणार”
स्वबळाचा नारा
नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून, त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी निवडणुका महाविकास आघाडीत न लढता काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढेल असा निर्धार नाना पटोले यांनी अनेकवेळा बोलून दाखवला आहे. त्यानंतर आता नाना पटोले यांनी पाळत ठेवत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवर केल्याने, महाविकास आघाडीतील वाद हळूहळू समोर येत आहेत.
दरम्यान लोणावळ्यातील एका मेळाव्याला संबोधित करताना नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो. मी बोलल्यावर खुपतं, असं सांगतानाच आपण काहीच बोलायचं नाही. पण तो त्रास आपली ताकद बनवा. मी स्वबळावर लढायचं म्हणालो. यावर माघार घेणार नाही. त्यामुळे कामाला लागा, असं पटोले म्हणाले होते.
VIDEO : नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
संबंधित बातम्या
नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी कशाला बोलू?; शरद पवारांनी फटकारले