पाच राज्यातील पराभवातून महाराष्ट्र काँग्रेसनं काय धडा घेतला? डिजीटल सदस्य नोंदणीत 10 लाखाचा टप्पाही अपूर्ण!
काँग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणीबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी एच. के. पाटील यांनी आता हायकमांडला काय स्पष्टीकरण द्यायचं? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसला केलाय.
मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेसला मानहाणीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबमध्ये तर सत्ताधारी राहिलेल्या काँग्रेसचा (Congress) आम आदमी पक्षाने (Aam Aadami Party) सुपडा साफ केला. या पराभवातून महाराष्ट्र काँग्रेसनं काही धडा घेतला नसल्याचं पाहायला मिळतंय. कारण, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील (H.K. Patil) यांनीच या नोंदणीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. काँग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणीबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी एच. के. पाटील यांनी आता हायकमांडला काय स्पष्टीकरण द्यायचं? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसला केलाय.
महाराष्ट्र काँग्रेसला मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत 1 कोटी सदस्य नोंदणीचं टार्गेट देण्यात आलं होतं. मात्र, आता मार्चअखेर सुरु आहे. महिन्याचा शेवटचा आठवला सुरु असताना अद्याप 10 लाख सदस्य नोंदणीचा टप्पाही महाराष्ट्र काँग्रेसला गाठता आलेला नाही. यावरुन एच. के. पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. आता दिल्ली हायकमांडला काय स्पष्टीकरण द्यायचं? असा सवाल पाटील यांनी या बैठकीत विचारला. महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगणा आणि कर्नाटकची कामगिरी चांगली आहे. मग महाराष्ट्रात इतका निरुत्साह चांगला नसल्याची खंतही पाटील यांनी व्यक्त केलीय.
पटोलेंच्या दाव्याचं काय झालं?
काँग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणी अभियानाला जानेवारी 2022 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रातून सर्वात जास्त डिजीटल सदस्य नोंदणी करणार असा दावा केला होता. मिस कॉल देऊन सदस्य नोंदणी करण्यासारखे हे अभियान नसून हे अत्यंत पारदर्शक व विश्वासार्ह सदस्य नोंदणी अभियान आहे. हे अभियान यशस्वी करण्यात महाराष्ट्रातून मोठे योगदान देऊन देशात सर्वात जास्त सदस्य नोंदणी महाराष्ट्रातून करू, असं पटोले म्हणाले होते.
आधुनिक तंत्रज्ञानाचे पुढचे पाऊल- चव्हाण
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया देशात घातला त्याचे पुढले पाऊल म्हणजे हे डिजीटल सदस्य नोंदणी अभियान आहे. मोबाईच्या माध्यमातून ही सदस्य नोंदणी होणार असून अत्यंत जलदगतीने होणार असून अत्यंत विश्वासार्ह आहे, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले होते.
इतर बातम्या :