मजुरांनी उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिल्या, ते कदाचित योगींना आवडलं नसेल : संजय राऊत
"योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राला दोष देण्यापेक्षा त्यांच्या राज्यातील स्थलांतरित मजूर आपापल्या घरी सुखरुप पोहोचले का? त्यांना अन्नपाणी मिळतंय का? याकडे लक्ष्य द्यायला हवं", असं संजय राऊत म्हणाले (Sanjay Raut slams Yogi Adityanath).
मुंबई : “स्थलांतरित मजुरांची महाराष्ट्राने दीड महिना चांगली व्यवस्था केली होती (Sanjay Raut slams Yogi Adityanath). मजूर रेल्वेने घरी जाताना महाराष्ट्र सरकार जिंदाबाद किंवा उद्धव ठाकरे जिंदाबाद, अशा घोषणा करत गेले. त्याचे व्हिडीओक्लिप्स आम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवले. योगींना ते कदाचित आवडलं नसेल”, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं (Sanjay Raut slams Yogi Adityanath).
“उत्तर प्रदेशातील मजुरांना काम द्यायचं असल्यास आमची परवानगी घ्यावी लागेल”, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्हालाही बाहेरच्या राज्यातील मजुरांसाठी नियम बनवावे लागतील. सगळ्यांना पारखून घ्यावं लागेल”, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं.
“योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राला दोष देण्यापेक्षा त्यांच्या राज्यातील स्थलांतरित मजूर आपापल्या घरी सुखरुप पोहोचले का? त्यांना अन्नपाणी मिळतंय का? याकडे लक्ष्य द्यायला हवं. कारण देशभरातून गेलेले हिंदी भाषिक मजूर नरक यातना भोगत होते, त्यांना आपल्या गावात आणि घरात जाण्यापासून रोखण्यात आलं, हे आख्या देशाने आणि जगाने पाहिलं”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
“अनेक राज्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. कारण त्यांच्या भागातील कामगारांची काळजी महाराष्ट्र सरकारने उत्तम पद्धतीने घेतली. याचं त्यांनी कौतुक केलं. उदिसाचे नवीन पटनायक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सर्वांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आणि सरकारी यंत्रणेचे आभार मानले”, असे संजय राऊत म्हणाले.
राज्यपालांच्या भेटीवर संजय राऊत यांची मिश्किल टिप्पणी
“राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील अधूनमधून भेटत असतात. मी देखील त्यांची भेट घेतली. राजभवन हा असा परिसर आहे की, तिथे गेल्यावर पुन्हा जावसं वाटतं. निसर्गरम्य परिसर आहे. वास्तुकला तिथे उत्तमप्रकारे जपलेली आहे. पुरातत्व खात्याने चांगल्याप्रकारे इमारतीचं रक्षण केलं आहे. त्या इमारतीत चांगली माणसे राहायला येतात. त्यांच्याशी संवाद साधण्याचा एक आनंद असतो. बाजूला समुद्र आहे. मोरांचे थवे नाचत असतात. आंब्यांचे झाडे आहेत”, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
“राजभवन सारखं निसर्गरम्य वातावरण मुंबईतल्या आमच्यासारख्या लोकांना पाहता येत नाही. राज्यपाल मायाळू आहेत. ते आम्हाला चहासाठी बोलवतात. तेवढंच आम्हाला ते निसर्गदर्शन होतं. राज्यपालांशी चर्चा करता येते. राज्यपाल चर्चेसाठी बोलवतात म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राजभवनावर गेले. नेत्यांचा राज्यपालांना भेटणं हा अधिकार आहे”, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.
पीयूष गोयल यांच्यावर टीका
“पीयूष गोयल हे राज्यसभेत महाराष्ट्राचे मंत्री आहेत. ते या राज्याचे प्रतिनिधीदेखील आहेत. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राचे प्रश्न वेगळे आहेत. हे केंद्रातल्या प्रत्येक मंत्र्याने समजून घेतलं पाहिजे. याशिवाय महाराष्ट्रातून अनेक गाड्या यादीशिवाय सुटलेल्या आहेत. त्याची यादी आमच्याकडे आहे. त्यामुळे यादी वगैरे कशाला मागत आहात?” असा सवाल संजय राऊत यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना विचारला.
“राज्य सरकार हे विरोधी पक्षातील सरकार आहे, असा विचार करु नये. महाराष्ट्राला राज्याच्या नजरेने पाहिलं तर यादींचा प्रश्न येणार नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्राचेच केंद्रातले मंत्री यादी मागत आहेत. याचं आश्चर्य आणि खेद वाटतो”, असं संजय राऊत म्हणाले.
“पीयूष गोयल वाईट काम करतात असं आम्ही म्हणालो नव्हतो. आम्हाला अपेक्षित गाड्या मिळाल्या नाहीत. त्या मिळाल्या असत्या तर कदाचित स्थलांतरित मजूर लवकर आपापल्या गावी पोहोचले असते, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली. पीयूष गोयल यांनी त्यावर चिड व्यक्त केली. सध्याचं एकंदरीत वातावरण पाहता चिडचिड होणं स्वाभाविकच आहे”, असं राऊत म्हणाले.
“सरकार महाविकास आघाडीचं आहे आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. साधारण अशी परंपरा असते की आघाडीत ज्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो त्याच्या नावाने सरकारची ओळख असते”, असंदेखील संजय राऊत यावेळी म्हणाले.
संबंधित बातम्या :
कथित ऑडिओ क्लिपमध्ये पृथ्वीबाबा म्हणाले, हे सरकार आमचं नाही, आता एकनाथ शिंदे म्हणतात…
राज्यपालांच्या भेटीसाठी पवार राजभवनावर, पटेल म्हणतात कोश्यारींनी चहासाठी बोलावलं