वडिलांच्या अकाली निधनामुळे राजकारणात एन्ट्री, काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, जाणून घ्या पूनम महाजनांचा राजकीय प्रवास
Poonam Mahajan | प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर पूनम महाजन यांनी 2006 साली राजकारणाच्या मैदानात एन्ट्री घेतली. वयाच्या 26 व्या वर्षी पूनम महाजन यांनी भाजपेच प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले.
मुंबई: प्रमोद महाजन यांच्या राजकारणाचा वारसा पुढे चालवणाऱ्या पूनम महाजन या सध्याच्या घडीला राजकारणात तितक्याशा सक्रिय दिसत नसल्या तरी वलयांकित भाजप नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. 2014 मध्ये मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत प्रिया दत्त यांचा पराभव करून पूनम महाजन यांनी लोकसभेत प्रवेश केला. 2019 मध्येही त्यांनी याच कामगिरीची पुनरावृत्ती केली. त्यानंतर सध्या पूनम महाजन भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर सक्रिय आहेत.
कोण आहेत पूनम महाजन?
पूनम महाजन यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 रोजी मुंबईत झाला. त्या प्रमोद महाजन आणि रेखा महाजन यांच्या कन्या आहेत. राहुल महाजन हा त्यांचा मोठा भाऊ आहे. पूनम महाजन यांनी 2006 साली राजकारणात प्रवेश केला.
पूनम महाजन यांची राजकीय कारकीर्द
प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर पूनम महाजन यांनी 2006 साली राजकारणाच्या मैदानात एन्ट्री घेतली. वयाच्या 26 व्या वर्षी पूनम महाजन यांनी भाजपेच प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. त्यानंतर पूनम महाजन यांच्या भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. 2009 साली पूनम महाजन यांनी घाटकोपर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे तत्कालीन नेते राम कदम यांच्याविरोधात निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत पूनम महाजन पराभूत झाल्या.
त्यानंतर 2010 साली पूनम महाजन यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. 2014 मध्ये त्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. या निवडणुकीत त्यांच्यासमोर काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचे आव्हान होते. मात्र, पूनम महाजन यांनी त्यांचा 1.86 लाखांच्या मताधिक्याने दणदणीत पराभव केला होता. यापूर्वी भाजपला कधीही उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विजय मिळालेला नव्हता. मात्र, पूनम महाजन यांनी ती कामगिरी करुन दाखविली. 2019 च्या निवडणुकीतही पूनम महाजन यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ स्वत:कडेच राखण्यात यश मिळवले.
शरद पवारांना म्हणाल्या ‘शकुनी मामा’, अजित पवारांकडून तोडीस तोड प्रत्युत्तर
मध्यंतरी पूननम महाजन आणि पवार घराण्यातील वाद चांगलाच गाजला होता. मुंबईतील एका कार्यक्रमात पूनम महाजन यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार म्हणजे राजकारणातील ‘मंथरा’ आणि ‘शकुनी’ आहेत. स्वतःला मिळालं नाही की इकडंच तिकडे आणि तिकडंच इकडं करतात, असे पूनम महाजन यांनी म्हटले होते.
या टीकेला शरद पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तोडीस तोड प्रत्युत्तर दिले होते. आपण कोणाबद्दृल आणि काय बोलतोय याचं भान ठेवायला हवं. तुमच्या वडिलांना तुमच्या चुलत्यानं का मारलं असं आम्ही विचारलं तर? सख्ख्या भावानं सख्ख्या भावाला मारलं. महाजन कुटुंबात हे एवढं महाभारत का घडलं याचं काय उत्तर आहे. तुम्हाला बोलता येतं, तसं आम्हाला पण बोलता येतं. पण पातळी सोडायला नको, हा विचार करून आम्ही बोलत नाही. मात्र तुम्ही काहीही बोलाल तर सहन करणार नाही. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात. त्यामुळे जास्त शहाणपणा करू नये. संयम पाळावा, असे अजित पवार यांनी म्हटले होते.
‘राजकारणात महाजनांनाही त्रास होतो’
राजकारणात महाजनांनाही त्रास होतो, असे एक विधान पूनम महाजन यांनी मध्यंतरी केले होते. दिवंगत नेते प्रमोद महाजन हे भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. मात्र त्यांच्यानंतर खुद्द महाजन कुटुंबालाही अनेक त्रासाला सामोरं जावं लागल्याचे पूनम महाजन यांनी म्हटले होते. वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदा 2009 साली माझं लोकसभेचं तिकीट कापलं गेलं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत नको असलेल्या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली.
या निवडणुकीत पराभूत झाल्यावर सगळ्यांनीच डावललं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी ज्या मतदारसंघात खूप तयारी केली, तेथून तिकिटच कापण्यात आलं. मग मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केल्यावर अडचणीच्या मतदारसंघात उमेदवारी दिली. मदत मागून कुणीही मदतीला न आल्यावर आपण या मतदारसंघात नवीन टीम तयार करून जिद्दीने निवडणूक लढवली आणि जिंकली, असे सांगत पंकजा यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला घरचा आहेर दिला होता.
‘मीही लैंगिक अत्याचाराची बळी’
पूनम महाजन यांनी मध्यंतरी एका कार्यक्रमात आपणही लहानपणी लैंगिक अत्याचाराच्या प्रसंगाला सामोरे गेल्याचा गौप्यस्फोट केला होता. जेव्हा माझ्याकडे कारने जायला पैसे नसायचे. तेंव्हा मी वरळीवरून वर्सोवाला क्लासला जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करायचे. तेंव्हा लोक माझ्याकडे कामूक नजरेनं पाह्यचे. पण या प्रकाराने मी विचलीत होत नसे. स्वत:ला कमकूवत समजत नसे. माझ्यासारखीच अशी परिस्थिती तुमच्यावर ओढवली आणि तुमच्याकडे जर कोणी वाईट नजरेने पाहत असेल तर स्वत:ला कमकुवत समजू नका. कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर सरळ त्याच्या कानशिलात ठेवून द्या, असे पूनम महाजन यांनी म्हटले होते.
संबंधित बातम्या:
युवासेनेच्या नाराजीनंतर पूनम महाजन बिथरल्या, थेट ‘मातोश्री’च्या दारावर
घर-दार विकलं, पूनम महाजन यांची संपत्ती 106 कोटींनी घटली!
ओवेसींच्या ‘कॉन्ट्रॅक्ट मॅरेज’ला उत्तर, पूनम महाजन यांचं धडाकेबाज भाषण