Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी ठरवलं तरी ते भाजपसोबत सरकार आता बनवू शकत नाहीत, का? 48 तासातले पवार-काँग्रेसचे दोन डाव लक्षात घ्या
Uddhav Thackeray : शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे एकाकी पडले आहेत. या बंडानंतर अवघ्या 48 तासातच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेभोवती डाव टाकले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत सरकार बनवण्याचे दरवाजे बंद झाले.
मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांची चांगलीच कोंडी झाली आहे. शिवसेनेचे तब्बल 46 आमदार फुटले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीला हादरे बसले आहेत. आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत. पण भाजपशी युती करा, अशी अटच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे ठेवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याची अडचण झाली आहे. एक तर भाजपसोबत (bjp) युती करण्याची वेळ निघून गेली आहे. दुसरं म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसने टायमिंग साधत खेळी केली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना इच्छा असूनही भाजपसोबत जाणं अशक्य झालं आहे. आता तर उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ 15 आमदार असल्याचा मेसेज गेला आहे. शिवाय उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानही सोडलं आहे. त्यामुळे आता भाजपसोबत जाणं त्यांच्यासाठी अधिकच मुश्किल झालं आहे.
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे एकाकी पडले आहेत. या बंडानंतर अवघ्या 48 तासातच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेभोवती डाव टाकले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत सरकार बनवण्याचे दरवाजे बंद झाले. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करा, तरच आम्ही तुमच्यासोबत येऊ असं उद्धव ठाकरेंना सांगितलं. तर दुसरीकडे शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांनी थेट उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आम्ही तुमच्यासोबतच आहोत, असं आश्वासन दिलं. एककीडे पार्टी फुटत असताना पक्षाच्या आमदारांचं ऐकायचं की ज्यांच्यासोबत आघाडी करून सत्ता स्थापन केली, अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भोगलं त्यांना पाठ दाखवायची असं धर्मसंकट उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभं राहिलं. त्यामुळे खेळीला बळी पडायचं की आपल्या आमदारांपुढे झुकायचं असा बाका प्रसंग त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यामुळे त्यांनी आमदारांपुढे झुकायचं नाही, असा निर्णय घेतला.
पवारांची भेट आणि संदेश
शिवसेनेत बंड झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबईत आल्यावर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आम्ही शिवसेनेसोबतच असल्याचं सांगितलं. त्याआधीही दिल्लीतील पत्रकार परिषदेत पवार यांनी आम्ही शिवसेनेसोबत असल्याचं जाहीर केलं होतं. शिवसेनेतील बंडाळी मोठी असल्याचं लक्षात आल्यानंतर पवारांनी पक्षाची बैठक बोलावली. त्यांनी शिवसेनेच्या पाठिशी शंभर टक्के राहण्याचे आदेशच आमदारांना दिले. पवारांनी दिलेल्या विश्वासामुळे उद्धव ठाकरेंची कोंडी झाली. त्यामुळे राष्ट्रवादीला सोडून भाजपसोबत जाणं उद्धव ठाकरे यांना शक्यच नव्हतं. शिवाय ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठित खंजीर खुपसल्याचा मेसेज गेला असता. तसेच या बंडामागे ठाकरेच असल्याच्या चर्चांनाही बळ मिळालं असतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर धर्मसंकट उभं राहिलं होतं.
कमलनाथ मुंबईत आले, शब्द दिला
महाराष्ट्रात राजकीय संकट उभं राहिल्यानंतर काँग्रेसचे नेते कमलनाथ हे तातडीने मुंबईत आले. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना मुंबईला पाठवलं. त्यानंतर कमलनाथ, बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना काँग्रेस शिवसेनेच्या पाठिशी ठामपणे असल्याचं आश्वासन दिलं. या कठिण प्रसंगात काँग्रेस सोबत आल्यानेही मनात असूनही उद्धव ठाकरे यांना आमदार सांगतील तिकडे जाणं शक्यच नव्हतं. नाही तर काँग्रेसचा विश्वासघात केल्याचं चित्रं निर्माण झालं असतं.
भाजपसोबत जाणं म्हणजे नाचक्की
एकीकडे पवार आणि काँग्रेस यांनी दिलेला विश्वास आणि दुसरीकडे आमदारांकडून भाजपसोबत जाण्याचा दबाव यामुळे उद्धव ठाकरे पुरते कोंडीत सापडले होते. भाजपने फसवणूक केली. गद्दारी केली. बंददाराआडील चर्चेतील शब्द फिरवला, असं उद्धव ठाकरे म्हणत होते. ज्या कारणासाठी भाजपला सोडून दोन्ही काँग्रेससोबत आघाडी केली. आता त्याच भाजपसोबत जाणं हेच त्यांच्यासाठी मानहानी करणारं ठरलं असतं. पुन्हा भाजपसोबत गेले असते तर ती त्यांची नाचक्की ठरली असती. म्हणूनच ते भाजप सोबत गेले नसल्याचंही सांगितलं जात आहे.