भाजप प्रवेशासंदर्भात अजित पवार यांचे टीव्ही-९ कडे मोठे वक्तव्य, वाचा काय म्हणाले अजितदादा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची बातमी इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने दिली आहे. या बातमीने राज्यभरात खळबळ उडाली. मंगळवारी सकाळपासून प्रतिक्रिया सुरु झाल्या. अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलेय...
सुनील काळे, मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची चिन्ह दिसतायत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ४० आमदारांसह भाजपसोबत जाणार असल्याची बातमी इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने दिली आहे. या बातमीने राज्यभरात खळबळ माजवली आहे. दुसरीकडे अजित पवार यांनी एकाएकी पुण्यातले सगळे कार्यक्रम रद्द करून मुंबईत गेले. मुंबईत आपल्या विश्वासू व्यक्तींसोबत त्यांची खलबतं सुरु आहे. उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना सुप्रीम कोर्ट अपात्र ठरवेल, असे गृहित धरून शिदेंच्या जागी अजित पवार यांची वर्णी लागू शकते, असा दावा याच वृत्तपत्राने केला आहे. या सर्व दाव्यांवर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणतात अजित पवार
अजित पवार यांनी राजकीय चर्चा फेटाळून लावल्या आहेत. या चर्चांना काहीच अर्थ नसल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी टीव्ही ९ शी बोलताना केला. नव्या राजकीय समिकारणांना तथ्य नाही. भाजप आणि शिंदे गटाकडून हे वक्तव्य केले जात आहे, त्यात तथ्य नाही. परंतु सध्या अजित पवार अजून माध्यमांसमोर आले नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गुढ वाढले आहे.
शरद पवार यांचे मौन
सगळ्या घडामोडींत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मौन बाळगले आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्या घेण्यासाठी त्यांना फोन करून बोलावत आहेत, मात्र मोठे पवार यावर काहीही बोलत नाहीयेत. २०१९ मध्ये अजित पवार यांची बंडखोरी दिसून आली तेव्हा शरद पवार यांनी पक्ष अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना बोलावून एकत्र राहण्याचं आवाहन केलं होतं. मात्र आजच्या घडीला शरद पवार यांचा अजूनही फोन आलेला नाही, याचं आश्चर्य वाटत असल्याचं राष्ट्रवादीच्या सूत्राने सांगितल्याचा दावा केला जात आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणतात
या सर्व घडामोडींसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांकडे वक्तव्य केले होते. उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, भाजपविरोधात लढण्यासाठी मी एकटाच राहणार आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेस नेत्यांकडे त्यांनी हे वक्तव्य केल्याचा दावा केला जात आहे.