पहिल्या दिवशीच विरोधकांनी केली सरकारची कोंडी, नीलम गोऱ्हे प्रकरणात सरकार अडचणीत
maharashtra politics news : भाजपने आणलेला अविश्वास प्रस्ताव संमत करण्यासाठी विरोधक आक्रमक झाले होते. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावासाठी विरोधक आक्रमक झाल्याचे दृश्य दिसले. हा विषय राज्यपालांच्या दरबारातही गेला.
मुंबई | 17 जुलै 2023 : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. भाजपने आणलेल्या प्रस्तावावरुन सत्ताधारी आडचणीत आले. हा प्रस्ताव विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्यासंदर्भातील होता. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात भाजपने आणलेला अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी महाविकास आघाडी आग्रही होती. यासाठी महाविकास आघाडीने राज्यापालांची भेट घेतली. त्यामुळे कमी सदस्य संख्या असताना सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यात महाविकास आघाडी पहिल्या दिवशी यशस्वी झाली.
काय आहे प्रकार
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. नीलम गोऱ्हे या पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप करत त्यांनी हा अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावेळी नीलम गोऱ्हे ठाकरे गटासोबत होत्या. परंतु आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात दाखल अविश्वास ठराव मागे घ्यावा असा प्रस्ताव दरेकर यांनी मांडला आहे.
महाविकास आघाडी आक्रमक
डॉ. नीलम गोऱ्हे, प्रा. मनिषा कायंदे आणि विप्लव बजोरिया विधान परिषदेतील हे तीन आमदार आता शिंदे गटासोबत आहे. परंतु गोऱ्हे या उपसभापती आहेत. त्यांनी पक्षांतर केले आहे. यामुळे त्या संवैधानिक पदावर राहू शकत नाही, त्यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी महाविकास आघाडीने केली. त्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आक्रमक झाले.
राज्यपालांची घेतली भेट
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात जाऊन भेट घेतली. नीलम गोऱ्हे यांच्यामुळे घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. त्यांना उपसभापतीपदावरुन हटावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या ४० आमदारांनी राज्यपालांकडे यावेळी केली. यासंदर्भातील माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांना दिली.
प्रविण दरेकर यांनी जर प्रस्ताव मागे घेतला असेल तर महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव दाखल केला जाईल, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सांगितले. सरकारकडे आता पाशवी बहुमत आहे, त्यांच्याकडून सौदाह्यपूर्वक वागणूक मिळेल. सरकार सामन्जस्य दाखवतील, अशी अपेक्षा होती, असे त्यांनी सांगितले.