नागपुरात मोठा राजकीय भूकंप?, काँग्रेसच्या मध्यरात्री गुप्त बैठका, सांगली पॅटर्नची चाचपणी; राष्ट्रवादी आक्रमक
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत नागपूरमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने मध्यरात्री गुप्त बैठक घेऊन नागपूर पूर्वची जागा ताब्यात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार गट आक्रमक झाला असून, जागा न मिळाल्यास राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. या वादामुळे महाविकास आघाडीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या या निर्णयावर शरद पवार गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळ जवळ पूर्ण झालं आहे. उद्या किंवा सोमवारपासून महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यास सुरुवातही होणार आहे. या दोन दिवसात आघाडीत मोठी लगबग दिसणार असली तरी नागपूरमध्ये मात्र महाविकास आघाडीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने नागपूरमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक घेतली. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत शरद पवार गटाला नागपूर पूर्वची जागा न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार गट चांगला आक्रमक झाला आहे. शरद पवार गटाने काँग्रेसचा निषेध म्हणून राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये महाविकास आघाडीत राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे.
नागपूरातील मतदारसंघावरुन महाविकास आघाडीच घमासान पाहायला मिळत आहे. काँग्रेसने नागपुरात मध्यरात्री गुप्त बैठक घेतली. त्यात नागपूर पूर्ववर दावा सांगितला आहे. त्यामुळे शरद पवार गट आक्रमक झाला आहे. नागपूर पूर्व मतदारसंघ आम्हाला दिला पाहिजे. नाही मिळाला तर आम्ही काँग्रेसचं कामच करणार नाही, असा इशारा शरद पवार गटाने दिला आहे.
आम्ही काय सतरंज्या उचलायच्या?
पूर्व नागपूरची जागा मिळावी म्हणून शरद पवार गटाने नागपुरात तातडीची बैठक बोलावली आहे. नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला गेल्यास राजीनामा देण्याचा इशाराही शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. काल रात्री काँग्रेसची गुप्त बैठक पार पडली. त्यानंतर आज शरद पवार गट आक्रमक झाला आहे. आम्ही काय फक्त काँग्रेसच्या सतरंज्या उचलायच्या का? असा सवाल शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे आणि नेते रविनिश पांडे यांनी केला आहे. पक्षाच्या बैठकीत त्यांनी हा सवाल केला आहे.
काल रात्री काय घडलं?
दरम्यान, काँग्रेस नेते नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात जागा वाटपावरून वाद झाला. त्यानंतर नागपूरमध्ये गुप्त बैठकांचं सत्र सुरू झालं. सांगली पॅटर्नच्या चाचपणीसाठी काल रात्री काँग्रेसच्या नागपुरात गुप्त बैठका झाल्या. शरद पवार गट नागपूर पूर्वची जागा आणि ठाकरे गट नागपूर दक्षिणची जागा काँग्रेसला सोडायला तयार नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या दोन्ही जागा नाही मिळाल्या तर नागपूरमध्ये सांगली पॅटर्न राबवण्याची चाचपणी करण्यासाठी काँग्रेसने काल रात्री गुप्त बैठका घेतल्या. नागपूर पूर्व आणि नागपूर दक्षिण मतदारसंघात या बैठका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. त्याची कुणालाही खबर नव्हती.
नागपूर पूर्वमध्ये शरद पवार गटाची ताकद नाही. त्यांचा एकही नगरसेवक नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती नागपुरातील सहापैकी एकही जागा मित्र पक्षाला सोडायची नाही, असा निर्धार स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केला आहे. शरद पवार गटाला ही जागा गेली तर सांगली पॅटर्न राबवायचा यावरही या बैठकीत एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेस नेते आमदार अभिजीत वंजारी आणि संगिता तलमले यांच्या नेतृत्वात या बैठका झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीत संजय राऊत यांच्या अडेलतट्टू भूमिकेवरही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.