Maharashtra politics | शिंदे-भाजप युतीचं महासंकट, महाविकास आघाडी वाचवायची कशी? काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री मातोश्रीवर, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
शिवसेना खासदार विनायक राऊत हेदेखील मातोश्रीवर दाखल झाले आहेत .तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हेदेखील मातोश्रीवर आले आहेत.
मुंबईः एकिकडे शिंदे (Eknath Shinde) गटानं शिवसेना या पक्षावरच दावा ठोकण्याची तयारी केली असताना सुप्रीम कोर्टानेही (Superme court) एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि विशेषतः शिवसेना पूर्णपणे घेरली गेली आहे. शिवसेनेनं शिंदे गटातील आमदारांवर केलेली अपात्रतेची कारवाईची मागणी तूर्तास तरी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गट सध्या तरी काहीसा ताकदवान झालेला दिसून येतोय. त्यातच आता महाविकास आघाडीतून शिंदे गटाच्या 50 आमदारांचा पाठिंबा काढून घेण्याची तयारीही सुरु झाली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची चर्चा सुरु आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत हेदेखील मातोश्रीवर दाखल झाले आहेत .तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हेदेखील मातोश्रीवर आले आहेत.
आघाडीतील मंत्र्यांची कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
एकनाथ शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्याच्या हालचालींना वेग दिलाय. तर भाजपनेही मोठ्या विजयी आविर्भावात बैठकांचं सत्र आयोजित केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं तर पुढे काय पावलं उचलायची, यावर आघाडीतील मंत्र्यांमध्ये चर्चा सुरु आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या वतीने केलेली आमदारांवरील अपात्रतेची कारवाई तूर्तास पुढे ढकलल्याने पुढील कायदेशीर लढाई कशी द्यायची यावरही विचारमंथन केले जाईल, अशी शक्यता आहे.
भाजपच्या कोअर कमिटीची बैठक
सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने कौल दिल्याचं दिसून आल्यानंतर भाजपच्या गोटातही सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या कोअर समितीची बैठक सुरु झाली आहे. यात सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे, आशिष शेलार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील आदी महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. एकनाथ शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर काय रणनीती आखायची यावर भाजपची चर्चा सुरु आहे.
गुवाहटीत शिंदे गटाचा जल्लोष
शिंदे गटातील आमदारांना तूर्तास अपात्र ठरवता येणार नाही, असा दिलासा कोर्टात मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने गुवाहटीत जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीचा पाठिंबा काढण्याविषयी येथे चर्चा झाली असून राज्यपालांना पाठवण्यात येणाऱ्या पत्रावरही आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येणार आहेत.