दावा… रस्सीखेच… सेटिंग आणि… विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीत मोठ्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. त्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. अवघ्या तीन महिन्यांवर या निवडणुका आल्याने इच्छुकांनी आतापासूनच सेटिंग करण्यास सुरुवात केली आहे. आपल्याला तिकीट मिळावं यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू झालेली दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. महाविकास आघाडीनंतर महायुतीतही आता जागा वाटपांवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी महायुतीत शाब्दिक खेळ खेळले जात आहेत. महायुतीत ही रस्सीखेच सुरू असतानाच इच्छुकांनी आपल्यालाच तिकीट मिळावं म्हणून लॉबिंग सुरू केली आहे. अनेकांना तिकीट पदरात पाडून घ्यायचं आहे, त्यामुळे इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटागाठी सुरू केल्या आहेत. आपल्याला अमूक मतदारसंघ सोडावा, अशी गळ या निमित्ताने घातली जात आहे.
महाविकास आघाडीनंतर आता महायुतीमध्येही पुण्यातील विधानसभांच्या जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. महायुतीत शिंदे गटाने पुणे शहरातील तीन जागांची मागणी केली आहे. हडपसर, वडगाव शेरी आणि खडकवासला या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला आहे. शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी पक्षाकडे ही मागणी केली आहे. हडपसर आणि वडगाव शेरी मतदारसंघ सध्या अजित पवार गटाकडे आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत शरद पवार गट आणि ठाकरे गटाने प्रत्येकी सहा जागांवर दावा केला आहे.
अमरावतीतील आठ मतदारसंघावर दावा
अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी चार विधानसभा मतदारसंघावर शिवसेना (शिंदे गट) दावा ठोकणार आहे. अमरावतीतील दर्यापूर, तिवसा, बडनेरा आणि अचलपूर मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीत पदाधिकारीकाऱ्यांनी ही मागणी केली आहे. अभिजीत अडसूळ यांनी दर्यापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.
मंजुळाताई मुख्यमंत्र्यांना भेटल्या
साक्री विधानसभा मतदारसंघ आमदार मंजुळाताई गावित यांच्याकडे आहे. या मतदारसंघात पुन्हा उमेदवारी मिळावी म्हणून गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली आहे.
वैभव पाटलांना ऑफर
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सांगलीतील खानापूर-विटा मतदारसंघातून लढवण्याची भूमिका जाहीर केली आहे. ठाकरे गटाने वैभव पाटलांना उमेदवारीची ऑफर दिल्याने ही निवडणूक अत्यंत रंजक होण्याची शक्यता आहे.